रत्नागिरी जिल्ह्यात ३ ठिकाणी कासवाच्या घरट्यांची मुख्य स्थळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 18:47 IST2025-01-07T18:47:16+5:302025-01-07T18:47:30+5:30

भारतीय वन्यजीव संस्थेकडून अभ्यास, कासवाची २० टक्के घरटी महाराष्ट्रात

Main turtle nesting sites in 3 places in Ratnagiri district | रत्नागिरी जिल्ह्यात ३ ठिकाणी कासवाच्या घरट्यांची मुख्य स्थळे

रत्नागिरी जिल्ह्यात ३ ठिकाणी कासवाच्या घरट्यांची मुख्य स्थळे

रत्नागिरी : डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेने २०२३-२४ मध्ये देशभरात केलेल्या ऑलिव्ह रिडले कासवाच्या अभ्यासाचा पहिला अहवाल वनविभागाला देण्यात आला आहे. या अहवालानुसार महाराष्ट्रात ऑलिव्ह रिडले (समुद्री कासव) कासवांची २० टक्के घरटी असल्याचे समाेर आले आहे. त्यातील मुख्य स्थळे रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास, आंजर्ले, गुहागर येथे असल्याचे अहवालात म्हटले आहे.

भारतीय वन्यजीव संस्थेच्या माध्यमातून देशभरातील संपूर्ण समुद्र किनाऱ्यावरील समुद्र कासवांची संख्या, त्यांच्या सवयी, घरटे करण्याचे स्थान, घरट्यांमध्ये नव्याने उत्पत्ती होणाऱ्या कासवाचा अभ्यास केला जात आहे. हा प्रकल्प २३-२४ ते २८-२९ पर्यंत देशभरात राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील ७२० किलोमीटर लांबीच्या पश्चिम किनारपट्टीवर २०२३-२४ पासून या अभ्यासाला प्रारंभ झाला आहे.

या अभ्यासाचा अहवाल राज्य वन विभागाला देण्यात आला आहे. या अहवालानुसार २०२३-२४ मध्ये २,५८४ घरटी आढळली आहेत. २०२२-२३ मध्ये घरट्यांची संख्या १,३८७ होती. त्यात वाढ झाल्याचे पुढे आले आहे.

राज्यातील समुद्रकिनारा असलेल्या पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांत हा अभ्यास करण्यात आला. त्यात ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे अधिक आढळली. रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास, आंजर्ले, गुहागर आणि सिंधुदुर्गातील वायंगणी ही घरट्यांची मुख्य स्थळे असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

जन्म देण्याचे प्रमाण ६० टक्के

समुद्री कासवांनी २०२२-२३ या वर्षात २,५३,६५२ अंडी घातली. त्यातील १,६०,७१६ अंड्यांतून पिले बाहेर आली. पिलांना यशस्वीरीत्या जन्म देण्याची टक्केवारी ६० आहे.

सर्वाधिक घरटी फेब्रुवारीत

कासव घरटी बनविण्यास नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात सुरुवात करतात. एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया सुरू असते. सर्वाधिक घरटी फेब्रुवारीत तयार होतात. त्याची टक्केवारी ४१.५ टक्के आहे. साधारणतः रात्रीच्या वेळी मादी अंडी घालते. एका विणीच्या हंगामात एक ते तीन वेळा साधारणतः २० ते २८ दिवसांच्या अंतराने अंडी घातली जातात.

Web Title: Main turtle nesting sites in 3 places in Ratnagiri district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.