सुरक्षा व्यवस्थेवर करडी नजर

By Admin | Updated: October 17, 2014 00:40 IST2014-10-17T00:10:30+5:302014-10-17T00:40:24+5:30

पर्यटन महामंडळ : निवास न्याहरी योजनेबाबत विभागवार बैठका-लोकमतचा प्रभाव

Look at the security system | सुरक्षा व्यवस्थेवर करडी नजर

सुरक्षा व्यवस्थेवर करडी नजर

प्रकाश वराडकर - रत्नागिरी -पर्यटन व्यवसायाच्या विस्ताराबरोबरच कोकणात काही अपप्रवृत्तींचाही शिरकाव होत आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या निवास न्याहरी योजनाधारकांनी योग्य सुरक्षा व्यवस्था केलेय की नाही, पर्यटकांबाबत योग्य नोंदी ठेवल्यात की नाहीत, याबाबत करडी नजर ठेवली जाणार आहे. या दिवाळीनंतर दोन्ही जिल्ह्यात योजनाधारकांच्या विभागवार बैठका घेतल्या जाणार आहेत. त्यात सुरक्षाविषयक काय व कशी काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रत्नागिरी विभागीय व्यवस्थापक जगदीश चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
गुहागर येथे गेल्या पंधरवड्यात कासवमित्र विश्वास खरे यांचा प्लेझर पॉइंट या त्यांच्या पर्यटक निवासस्थानात राहायला आलेल्या पर्यटकांनी खून केल्याचे उघड झाले. त्यानंतर दोन्ही जिल्ह्यात असलेल्या पर्यटन महामंडळाच्या निवास न्याहरी योजनेतील सुरक्षा व्यवस्था रामभरोसे असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द केले होते. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते बोलत होते.
गुहागरमध्ये जो प्रकार घडला तो गंभीर स्वरुपाचा आहे. त्यामुळेच पर्यटन व्यवसायात असलेल्या लॉजिंग, निवास न्याहरी यांसारख्यांना सुरक्षाविषयक दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे. याआधी निवास न्याहरी योजनाधारकांना दरवर्षी त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण करावे लागत होते. परिणामी दरवर्षी त्यांनी ठेवलेल्या नोंदी तपासणे, योजनेची योग्य अंमलबजावणी होते की नाही, याची पाहणी करणे शक्य होत असे. आता पहिल्या नोंदणीनंतर पुन्हा वर्षभराने दिला जाणारा नोंदणी परवाना हा पाच वर्षांसाठी आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था व अन्य नियमांचे तंतोतंत पालन केले जाते की नाही, याची पाहणी करण्यासाठी पर्यटन महामंडळाला तशी व्यवस्था निर्माण करावी लागणार आहे. तसेच दरवर्षी वा सहा महिन्यातून एकदा किंवा अचानकपणे सुरक्षाविषयक आढावा घेण्याबाबतही विचार होऊ शकतो. याबाबत वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे ते म्हणाले.
निवासी न्याहरी योजनेत पर्यटकांची सुरक्षितता हा विषय अतिशय महत्त्वाचा असल्याने त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी गणपतीपुळे, दापोली, गुहागर तसेच ज्या भागात योजनाधारक अधिक आहेत त्या ठिकाणी अशा मागर्दशन सभा घेण्यात येतील. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रत्येकी तीन ते चार सभा होतील. त्याबाबतचे नियोजन केले जात असून, दिवाळीनंतर या सभा घेतल्या जाणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Look at the security system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.