लॉकडाऊनचा फटका गणेशमूर्ती व्यावसायिकांनाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:23 IST2021-05-31T04:23:31+5:302021-05-31T04:23:31+5:30
रत्नागिरी : लॉकडाऊनचा फटका विविध व्यवसायांना बसला त्याप्रमाणे गणेशमूर्तीशाळाही यातून सुटलेल्या नाहीत. दिवसेंदिवस कोरोनाचे सावट गडद होत चालले ...

लॉकडाऊनचा फटका गणेशमूर्ती व्यावसायिकांनाही
रत्नागिरी : लॉकडाऊनचा फटका विविध व्यवसायांना बसला त्याप्रमाणे गणेशमूर्तीशाळाही यातून सुटलेल्या नाहीत. दिवसेंदिवस कोरोनाचे सावट गडद होत चालले आहे. त्यामुळे गणेशोत्सवाचे नेमके स्वरूप कसे असेल, याची चिंता भाविकांप्रमाणे मूर्तिकारांनाही लागली आहे. त्यातच साहित्य उपलब्ध होत नसल्याने मूर्ती रेखाटणावर परिणाम झाला आहे.
कोकणात गणेशमूर्ती प्रामुख्याने शाडूच्या मातीपासून तयार केल्या जातात. ही शाडूची माती गुजरातमधून तर प्लास्टर ऑफ पॅरिसपासून मूर्ती तयार करण्यासाठी लागणारी माती बिकानेर, जयपूर (राजस्थान)मधून येते. राज्यांतर्गत सीमा बंद असल्याने मालवाहतूकही बंद आहे. वेळेवर मातीचा पुरवठाच झाला नाही तर मूर्ती तयार कशा कराव्यात, अशा प्रश्न मूर्तिकांरासमोर निर्माण झाला आहे.
यावर्षी सप्टेंबरमध्ये गणेश चतुर्थी आहे. गणेशमूर्ती तयार करण्याचे काम मे महिन्यापासून सुरू होते. काही मूर्तीशाळेत अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गणेशमूर्ती तयार करण्यास प्रारंभ होतो. मात्र, मातीची उपलब्धता होत नसल्यामुळे काही मूर्तिकारांनी लाल मातीचा वापर सुरू केला आहे. गणेशमूर्ती शाळांना लागणारी माती राजस्थान व गुजरातमधून पेण, कोल्हापुरात येते. तेथून ती अन्यत्र वितरीत केली जाते. एकूणच मूर्तीशाळेत सलग चार ते पाच महिने याची तयारी सुरू होते. माती, रंग तसेच अन्य कच्चा माल गरजेचा आहे. परंतु, वाहतूकच बंद असल्याने कच्चा माल उपलब्ध होऊ शकत नसल्याने व्यवसायावर परिणाम झाला आहे.
कोेकणात गणेशोत्सव उत्साहाने साजरा करण्यात येतो. दरवर्षी जिल्ह्यात १ लाख ६६ हजार ५८७ ठिकाणी खासगी आणि ११० सार्वजनिक बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात येते. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही लॉकडाऊनमुळे अनेक लोक घरात आहेत. सरकारी तसेच खासगी आस्थापनांना लॉकडाऊनचा फटका बसल्याने उत्सवावर लॉकडाऊनचे सावट आहे, शिवाय गतवर्षीपासून मूर्तीच्या उंचीवर निर्बंध आले आहेत. छोटी मूर्ती आणून पूजा करण्याकडे भाविकांचा कल वाढला आहे.
गणेशमूर्ती रेखाटणाऱ्या कलाकारांची कमतरता भासत आहे. त्यातच इंधनाचे दर वाढले की, साहित्याच्या दरात वाढ होते. त्याप्रमाणे गणेशमूर्तीच्या दरात वाढ करणे शक्य होत नाही. लॉकडाऊनमुळे साहित्याची उपलब्धता होत नसल्याने गैरसोय होत आहे.
-------------------------------
गणेशमूर्ती व्यावसायिकांना सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाऊनच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. सप्टेंबरमध्ये गणेशोत्सव असला तरी कच्चा माल आत्ताच उपलब्ध होणे आवश्यक आहे. साहित्य उपलब्ध होत नसल्याने गैरसोय होत आहे. शासनाने गणेशमूर्तीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या वाहतुकीसाठी परवानगी द्यावी, जेणेकरून काम सुरू करता येईल. यावर्षी मूर्तीच्या दराबाबतही विचारच करावा लागणार आहे.
- आशुतोष कोतवडेकर, गणेश मूर्तिकार, रत्नागिरी.
-----------------------------
लॉकडाऊनचा फटका गणेश मूर्तिकारांना बसला असून, शाडू माती उपलब्ध होत नसल्याने लाल मातीपासून गणेशमूर्ती तयार केल्या जात आहेत.