Ratnagiri: विहिरीत बिबट्या पडला, मोटरची पाइप, दोरीला धरून बसला; वनविभागाने दिले जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 13:56 IST2025-09-22T13:56:09+5:302025-09-22T13:56:30+5:30
वनविभागाने अर्ध्या तासाच्या आतच बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद केले

Ratnagiri: विहिरीत बिबट्या पडला, मोटरची पाइप, दोरीला धरून बसला; वनविभागाने दिले जीवदान
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळेपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या भगवती नगर रामरोड येथे बिबट्या विहिरीत पडल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. या बिबट्याला वनविभागाने अर्ध्या तासातच विहिरीबाहेर काढून जीवदान दिले.
भगवती नगर रामराेड येथील भूषण जयसिंग घाग यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये बिबट्या पडला हाेता. रविवारी सकाळी त्यांच्या ही गाेष्ट लक्षात येताच त्यांनी पाली येथील वनपाल न्हानू गावडे यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यांनी रत्नागिरी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना माहिती दिली. त्यानंतर वनविभागाची रेस्क्यू टीम पिंजरा व साहित्यासह घटनास्थळी दाखल झाली.
विहिरीवर जाळे टाकून पिंजरा व रेस्क्यू साहित्य विहिरीत सोडण्यात आले. दोन ते तीन वेळा बिबट्या पिंजऱ्यावर आल्याने त्याला पुन्हा पिंजरा खाली करून पाण्यात मोकळा करून काही वेळाने या बिबट्याला पिंजऱ्यामध्ये वनविभागाने अर्ध्या तासाच्या आतच जेरबंद केले.
ही रेस्क्यूची कार्यवाही परिक्षेत्र वनअधिकारी प्रकाश सुतार, वनपाल न्हानू गावडे, वनरक्षक विराज संसारे, जाकादेवीच्या वनरक्षक शर्वरी कदम, किरण पाचारणे तसेच पोलिस अधिकारी ए. व्ही. गुरव, आर. एस. घोरपडे, ए. ए. अंकार, एन. एस. गुरव, सरपंच श्रेया राजवाडकर, पोलिस पाटील सुरज भुते, वन्य प्राणी मित्र महेश धोत्रे, ऋषिराज जोशी, रोहित खेडेकर, आदर्श मयेकर यांनी केली.
बिबट्या पाइप, दाेरीच्या सहाय्याने बसलेला
बिबट्या पडलेल्या विहिरीला ३ फूट उंचीचा कठडा आहे. या विहिरीची गोलाई सुमारे १६ फूट आणि खोली ४० फूट असून, ५ फुटावर पाण्याची पातळी आहे. विहिरीमध्ये बिबट्या मोटरच्या पाइपला व दोरीला धरून पाण्यावर बसलेला हाेता.
बिबट्या १० ते १२ महिन्यांचा
मालगुंड येथील पशुधन विकास अधिकारी स्वरूप काळे यांच्याकडून बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली. हा बिबट्या मादी जातीचा असून, अंदाजे १० ते १२ महिन्यांचा आहे. बिबट्या सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात साेडण्यात आले.