Ratnagiri: फासकीत अडकलेल्या बिबट्याची साडेतीन तासांनी सुटका, पिंजऱ्यात जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 16:18 IST2025-07-04T16:17:42+5:302025-07-04T16:18:59+5:30
बिबट्याला कोणतीही शारीरिक इजा झालेली नसल्याने नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार

Ratnagiri: फासकीत अडकलेल्या बिबट्याची साडेतीन तासांनी सुटका, पिंजऱ्यात जेरबंद
लांजा : वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी लावलेल्या फासकीत बिबट्या अडकल्याची घटना गुरुवारी सकाळी लांजा तालुक्यातील गवाणे-मावळतवाडी येथे उघडकीला आली. अथक प्रयत्नानंतर या बिबट्याची फासकीतून सुखरूप सुटका करून त्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.
उद्धवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश करंबेळे हे गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान मावळतवाडी येथे शेताकडे जात हाेते. त्यावेळी त्यांना बिबट्याची चाहूल लागली. त्याचवेळी बिबट्याने डरकाळी फोडताच त्यांनी घाबरून तिथून पळ काढला. त्यानंतर त्यांनी वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या वनाधिकारी गिरिजा देसाई, सहायक वनसंरक्षक प्रियांका लगट यांच्या मार्गदर्शनाखाली या बिबट्याची फासकीतून सुटका करण्यात आली. पिंजरा बंद करण्यात आलेल्या बिबट्याला गवाणे येथील शासकीय नर्सरीत उपचारासाठी ठेवण्यात आले होते. बिबट्याला कोणतीही शारीरिक इजा झालेली नसल्याने त्याला रात्री उशिरा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
गवाणे मावलतवाडी येथील जंगलमय भागात गणू बांबू करंबेळे यांच्या काजूच्या बागेत अज्ञाताने फासकी लावली होती. यामध्ये हा बिबट्या अडकला हाेता. हा बिबट्या तीन वर्षांचा असून, पहाटे ताे अडकल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ही कामगिरी रत्नागिरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार, राजापूरचे सामाजिक वनीकरणाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पाटील, वनपाल न्हानू गावडे, महादेव पाटील, वनरक्षक विक्रम कुंभार, बाबासाहेब ढेकळे, श्रावणी पवार, नमिता कांबळे, सिद्धार्थ हिमगिरे, वन मजूर चंद्रकांत रामाने, तसेच प्राणीमित्र दीपक कदम, मंगेश लांजेकर, मयुरेश आंबेकर, मंगेश आंबेकर यांनी केली.
साडेतीन तासांनी सुटका
फासकीत अडकलेल्या बिबट्याची सुटका करण्यासाठी सकाळी ९ वाजता सुरुवात करण्यात आली. दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमाराला त्याची सुटका करून पिंजऱ्यात बंद करण्यात यश आले. यासाठी गवाणे येथील ग्रामस्थांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मदत केली.