विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान, रत्नागिरी वन विभागाची तत्परता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 17:53 IST2025-10-25T17:52:51+5:302025-10-25T17:53:08+5:30
बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान, रत्नागिरी वन विभागाची तत्परता
रत्नागिरी : शहरानजिकच्या मजगाव येथे गुरुवारी (दि. २३) सकाळी विहिरीत पडलेल्या बिबट्यालारत्नागिरी परिक्षेत्र वन विभागाच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले आहे.
मजगाव येथील अमित अली अब्दुल हमीद काझी यांच्या आंबा कलम बागेतील कठडा असलेल्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची माहिती सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास मजगावचे पोलिसपाटील अशोक केळकर यांनी पालीचे वनपाल न्हानू गावडे यांना दिली. त्यानंतर रत्नागिरी परिक्षेत्राचे वन अधिकारी प्रकाश सुतार यांना माहिती मिळताच त्यांची रेस्क्यू टीम, पिंजरा व आवश्यक त्या साहित्यासह घटनास्थळी दाखल झाली.
कच्चा कठडा असलेल्या या आयताकृती विहिरीची लांबी सुमारे १५ फूट, रुंदी १० फूट आणि खोली २५ फूट आहे. पाण्याची पातळी ७ ते ८ फुटांवर होती. बिबट्या या विहिरीत एका दगडावर पाण्यात बसलेला होता. जाळीचे नेट विहिरीच्या सभोवार टाकून विहीर बंदिस्त करण्यात आली. त्यानंतर पिंजऱ्याला दोऱ्या बांधून पिंजरा सुरक्षित विहिरीत सोडण्यात आला. बिबट्याला पंधरा मिनिटांच्या आतच सुरक्षित पिंजऱ्यामध्ये घेण्यात आले. मालगुंडचे पशुधन विकास अधिकारी स्वरूप काळे यांच्याकडून बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून घेतली. तो सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
बिबट्या हा नर असून, तो सुमारे ६ ते ७ वर्षे वयाचा आहे. भक्ष्याचा पाठलाग करताना तो विहिरीत पडला असावा, असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला. विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, सहायक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली ही बचाव मोहीम राबविण्यात आली. यासाठी रत्नागिरी परिक्षेत्राचे वन अधिकारी प्रकाश सुतार, पालीचे वनपाल न्हानू गावडे, लांजा वनपाल सारीक फकीर, वनरक्षक विराज संसारे, शर्वरी कदम, प्राणिमित्र शाहीद तांबोळी, ऋषिकेश जोशी, महेश धोत्रे, पोलिस अधिकारी भगवान पाटील, राजेंद्र सावंत, शरद कांबळे, रामदास कांबळे, सरपंच, फैय्याज मुकादम, तंटामुक्त समिती अध्यक्ष बरकद मुकादम, पोलिसपाटील अशोक केळकर व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.
या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणी सापडल्यास वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई यांनी केले आहे.