परीक्षा यंत्रणेमध्ये समन्वयाचा अभाव : परीक्षार्थींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:30 IST2021-03-20T04:30:38+5:302021-03-20T04:30:38+5:30
मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेल्या वर्षभरात विविध कारणांनी चारवेळा राज्य सेवा पूर्व परीक्षा रद्द करण्यात आली ...

परीक्षा यंत्रणेमध्ये समन्वयाचा अभाव : परीक्षार्थींचे नुकसान
मेहरून नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : गेल्या वर्षभरात विविध कारणांनी चारवेळा राज्य सेवा पूर्व परीक्षा रद्द करण्यात आली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दि. १४ मार्च रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा रद्द करताच राज्यभरात जन आंदोलन उभारले. अखेर शासनाने नमते घेत रविवार दि.२१ मार्च रोजी परीक्षा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला, मात्र आरआरबी (रेल्वे प्रशासन) च्या परीक्षाही एकाच दिवशी दि.२१ मार्च रोजी होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठल्या तरी एकाच परीक्षेला बसावे लागणार आहे.
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवा करता यावी, यासाठी लोकसेवा आयोगासह रेल्वे सारख्या तत्सम परीक्षांचा अभ्यास विद्यार्थी करीत असतात. मात्र एकाच दिवशी परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असून शुल्क वाया जाणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली असून जिल्ह्यात एकूण तीन परीक्षा केंद्र आहेत. १२९१ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. वर्षभरात चार वेळा परीक्षा रद्द झाल्या होत्या. मात्र रविवारी परीक्षा असल्याने विद्यार्थीही सज्ज झाले आहेत. कोरोनामुळे बैठक व्यवस्थेबाबत दक्षता घेण्यात आली आहे.
आरआरबी परीक्षेची तारीख पूर्वनियोजित होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार दि. १४ मार्चला होणार होती. शासनाने परीक्षा रद्द करतानाच राज्यभरात जनआंदोलन उसळले. अखेर शासनाने घाईगडबडीने दि.२१ रोजी परीक्षा जाहीर केली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून एकावेळी एकच परीक्षा देता येणार आहे.
गेली अनेक वर्षे पदभरती फारच कमी संख्येने करण्यात येत आहे. त्यामुळे अभ्यास एके अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. आरआरबी व एमपीएससीची परीक्षा एकाच दिवशी असल्याने अनेकांचे परीक्षेसाठी भरलेले शुल्क वाया गेले आहे.
-प्रभाकर धोपट, खंडाळा
आधीच बेकारीची कुऱ्हाड कोसळलेल्या परीक्षार्थींचे नुकसान झाले आहे. परीक्षा घेणाऱ्या यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याने विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. दोन पैकी कोणती तरी एकच परीक्षा द्यावी लागणार आहे. नोकरीच्या संधी आधीच कमी असताना या नव्या घोळामुळे मानसिकतेवर परिणाम होत आहे.
- कल्पेश घवाळी, हर्चे