रत्नागिरीतील सिव्हीलच्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा, रक्तपुरवठा करताना अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 16:57 IST2018-06-08T16:57:29+5:302018-06-08T16:57:29+5:30
रत्नागिरी येथील शासकीय जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गरोदर महिला, बालके, डायलेसीस शस्त्रक्रिया, अपघाती रूग्ण यांना रक्तपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. यासाठी सध्या रक्तदात्यांच्या सहकार्याची गरज निर्माण झाली आहे.

रत्नागिरीतील सिव्हीलच्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा, रक्तपुरवठा करताना अडचण
रत्नागिरी : येथील शासकीय जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गरोदर महिला, बालके, डायलेसीस शस्त्रक्रिया, अपघाती रूग्ण यांना रक्तपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. यासाठी सध्या रक्तदात्यांच्या सहकार्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्हा शासकीय रूग्णालयात विविध आजारांचे रूग्ण तसेच वाढत्या अपघातांच्या संख्येमुळे दरदिवशी सरासरी २० ते २५ रक्तपिशव्यांचा पुरवठा करावा लागतो. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत शासकीय तसेच खासगी रुग्णालयांत दाखल असणाऱ्या रुग्णांना (विशेषत: हृदयशस्त्रक्रिया, डायलेसीस) नि:शुल्क रक्तपुरवठा करण्यात येतो.
रक्ताची वाढती गरज लक्षात घेता यासाठी शिबिरांच्या तसेच ऐच्छिक रक्तदानाच्या माध्यमातून रक्तसंकलित करावे लागते. एप्रिल ते जून या कालावधीत सुट्यांचा कालावधी असला तरी याच कालावधीत विविध साथीच्या आजारांच्या रूग्णांबरोबरच अपघातांची संख्या वाढत असल्याने जिल्हा रूग्णालयाला रक्त कमी पडत असल्याचे चित्र निर्माण होते. मात्र, या रक्तपेढीची टीम आवश्यक असेल तेव्हा शिबिराचे आयोजन करून रक्तदात्यांना आवाहन करते. वार्षिक २००० पिशव्या इतके रक्तसंकलन करणारी जिल्हा रूग्णालयाची रक्तपेढी आता वार्षिक ६००० पिशव्या इतके रक्तसंकलन व तितकाच रक्तपुरवठा करीत आहे.
सध्या या रूग्णालयात विविध आजारांची रूग्णसंख्या वाढू लागली आहे. तसेच प्रसुती, डायलेसीस रूग्ण, विविध शस्त्रक्रिया व इतर आजारांचे रूग्ण वाढल्याने या रक्तपेढीला रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. विविध रक्तगटांच्या केवळ १३ पिशव्या सध्या शिल्लक आहेत. गरोदर माता, बालके, डालेसीस शस्त्रक्रिया, अपघाती रूग्ण यांना रक्त पुरवठ्यात अडचणी येत आहेत. ओ पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, एबी पॉझिटिव्ह या गटांचे रक्त उपलब्ध नाही.
यावेळी जाणीव पुढे
या रक्तपेढीच्या सहाय्यासाठी सदैव धावून येणारी रत्नागिरीतील जाणीव फाऊंडेशन ही संस्था यावेळीही पुढे आली आहे. लवकरच चवे, जाकादेवी आणि रत्नागिरी येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.
कोणते गट नाहीत
सध्या रक्तपेढीकडे बी पॉझिटिव्ह, ओ पॉझिटिव्ह, एबी पॉझिटिव्ह या गटांचा रक्तसाठा शिल्लक नाही. रक्तपेढीतर्फे दोन ठिकाणी शिबिर घेऊन ३५ बॅगांचे रक्त संकलित करण्यात आले होते. मात्र, त्यापैकी २२ बॅगा संपल्याने आता १३ बॅग्ज शिल्लक आहेत.