आंब्याची चव चाखणेही कुवतीपलिकड
By Admin | Updated: April 17, 2015 00:05 IST2015-04-16T23:27:26+5:302015-04-17T00:05:14+5:30
कमी उत्पादन : चिपळुणात डझनाला ९०० रूपये, सामान्यांना होतोय आंबा महाग े

आंब्याची चव चाखणेही कुवतीपलिकड
असुर्डे : स्थानिक बाजारपेठेत दरवर्षी मुबलक नसेल पण सर्वसमान्यांना परवडेल, अशा दरात आंबा उपलब्ध होत असे. मात्र, अवकाळी पावसामुळे कोकणात यंदा आंबापिकाचे बरेच नुकसान झाले आहे. भाव गगनाला भिडला असल्याने आंबा विकत घेऊन खाणे म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण बनले आहे.अवकाळी पावसाने बागायतदार हवालदील झाले आहेत. दरवर्षीच्या तुलनेत केवळ ३० टक्के आंबा बाजारात विक्रीसाठी जाईल, असे या भागातील स्थानिक बागायतदार सांगत आहेत. युरोपसारखी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आंब्यासाठी खुली झाल्यामुळे चांगल्या प्रतिच्या आंब्याची निर्यात होणार आहे़ चिपळूण शहर, ग्रामीण भागात व आठवडा बाजारातही सावर्डे, खेर्डी बाजारात ७०० ते ९०० रुपये डझन अशा भावाने विक्री सुरू आहे. परप्रांतीय विक्रेते आंब्याची किरकोळ विक्री करण्यासाठी घरोघरी जाताना पूर्वी दिसायचे.चढते भाव व अल्प मागणी यामुळे तेही यावर्षी गायब झाले आहेत़ याला पर्याय म्हणून लोक रायवळी आंबे खरेदी करायचे. मात्र, रायवळी आंबाही बाजारात तुरळक प्रमाणात दिसत आहेत़ तेही चढ्या भावाने विक्री होताना दिसत आहे. दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी म्हणून हापूसऐवजी रायवळी आंबे लोक घेऊ लागले आहेत. रायवळ आंब्याचे पीकही ३५ टक्के एवढेच आले आहे. त्यामुळे दरवर्षी समोर पडलेला झाडाखालील आंबा न उचलणारे लोक आता त्यालाही तरसू लागले आहेत. कर्नाटकहून येणारा नीलम, रत्ना तसेच उत्तरेकडील आंब्याच्या दरातही यावर्षी दुप्पटीने वाढ झाल्याचे दिसत आहे़ त्यामुळे हापूसची चव चाखणे हे कुवतीबाहेर असल्याचे सर्वसामान्य ग्राहकांतून बोलले जात आहे़ (प्रतिनिधी)