अखेर 'रो-रो' सेवेला नांदगावात मिळणार थांबा; नाराज कोकणवासीयांच्या मागणीची रेल्वे प्रशासनाकडून दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:00 IST2025-08-06T12:58:32+5:302025-08-06T13:00:45+5:30
महाराष्ट्राच्या किनारी मार्गावरील प्रवाशांसाठी हे सोयीचे होणार

अखेर 'रो-रो' सेवेला नांदगावात मिळणार थांबा; नाराज कोकणवासीयांच्या मागणीची रेल्वे प्रशासनाकडून दखल
रत्नागिरी : अखेर कोकणातील प्रवाशांच्या नाराजीची दखल घेत कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने रो रो वाहतूक सेवेसाठी कोलाड (महाराष्ट्र) आणि वेर्णा (गोवा) दरम्यान नांदगाव रोडवर अतिरिक्त थांबा जाहीर केला आहे. या सेवेमुळे प्रवासी नांदगाव रोडवर त्यांची कार चढवू शकतील किंवा उतरवू शकतील. महाराष्ट्राच्या किनारी मार्गावरील प्रवाशांसाठी हे सोयीचे होणार आहे.
कोकण रेल्वेने सुरू केलेली रो रो वाहतूक सेवा कारसाठीही सुरू करण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने काही दिवसांपूर्वी घेतला होता. कोकण रेल्वेचा प्रवास सुखकारक, सोयीस्कर आणि सुलभ आणि स्वस्त असल्याने रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या रो-रोमधून कार आणण्याच्या सेवेचे स्वागत प्रवाशांनी केले.
मात्र, ही सुविधा कोकणवासीयांच्या उपयोगाची नसल्याचे लवकरच निदर्शनात आले. कार चढविणे आणि उतरविणे ही सेवा कोलाड (महाराष्ट्र) आणि वेर्णा (गोवा) या दोन ठिकाणीच ठेवण्यात आली होती. त्यामुळे मधल्या भागातील प्रवाशांना ही सुविधा घेणे महागडे ठरणारे होते. याबाबत माध्यमांनीही ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.
अखेर प्रवाशांकडूनही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्याने त्यांच्या मागणीवरून कोकण रेल्वे प्रशासनाने दखल घेत कोलाड आणि वेर्णा या दोन ठिकाणांदरम्यान नांदगाव रोड येथेही कारमालकांना कार चढविण्यासाठी आणि उतरविण्यासाठी थांबा देण्याचे जाहीर केले आहे.
ही सेवा सुरू झाल्यानंतर कोलाड येथून दुपारी ३ वाजता ही रो रो निघणार असून, रात्री १० वाजता नांदगाव रोड येथे पोहोचेल. मध्यरात्री १२ वाजता नांदगाव येथून निघून दुसऱ्या दिवशी सकाळी व वाजता वेर्णा येथे पोहोचेल. तर वेर्णा येथून दुपारी ३ वाजता सुटणारी रो रो नांदगाव रोड येथे रात्री ८ वाजता पोहोचेल. त्यानंतर रात्री १०:३० वाजता तिथून निघून कोलाड येथे सकाळी ६ वाजता पोहोचेल, असे कोकण रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.