कोंडिवळे शाळेत गळती सुरु, पालक आक्रमक, मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 13:37 IST2019-06-28T13:34:43+5:302019-06-28T13:37:45+5:30
कोंडिवळे जिल्हा परिषद शाळेत छप्पर गळती सुरु झाल्याने पावसाचे पडणारे पाणी वर्गखोल्यांत साठू लागल्याने समस्त विद्यार्थ्यांपुढे समस्या उभी ठाकली आहे. दरम्यान, जोवर या शाळेची दुरुस्ती होत नाही, तोवर विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नाही, असा निर्णय कोंडिवळेमधील शाळा व्यवस्थापन समितीने घेतला असून, तसे पत्र जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.

कोंडिवळे शाळेत गळती सुरु, पालक आक्रमक, मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय
राजापूर : कोंडिवळे जिल्हा परिषद शाळेत छप्पर गळती सुरु झाल्याने पावसाचे पडणारे पाणी वर्गखोल्यांत साठू लागल्याने समस्त विद्यार्थ्यांपुढे समस्या उभी ठाकली आहे. दरम्यान, जोवर या शाळेची दुरुस्ती होत नाही, तोवर विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नाही, असा निर्णय कोंडिवळेमधील शाळा व्यवस्थापन समितीने घेतला असून, तसे पत्र जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.
कोंडिवळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत एकूण १५ विद्यार्थी शिकत आहेत. मागील काही वर्षांपासून ही शाळा दुरुस्तीसाठी आली असून, त्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीसह ग्रामस्थांनी सातत्याने प्रशासनाकडे मागणी केली आहे. पण त्या प्रयत्नांना अजिबात यश आलेले नाही. यापूर्वी सन २००३मध्ये शाळा दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला गेला होता. पण नादुरुस्त होत असलेल्या शाळेकडे कुणीच लक्ष दिले नाही.
यावर्षी पहिल्याच दिवशी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून कोंडिवळे ग्रामपंचायतीकडे अनुदान जमा झाले आहे. पण खर्च मात्र झालेला नाही, त्यामुळे शाळा मोडकळीला आली असून, चालू पावसाळ्यात छप्पराला गळती लागल्याने वर्गखोल्यात पाणी साठत आहे. त्यामुळे शाळेची स्टेशनरी भिजली असून, गळक्या वर्गात मुलांना कसे बसवायचे, असा प्रश्न पालकांपुढे निर्माण झाला आहे.
यापूर्वी सातत्याने शाळा दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज विद्यार्थ्यांवर अशी वेळ आली असल्याचा आरोप पालक वर्गामधून होत आहे. शाळेची दुरुस्ती होत नाही, तोवर मुलांना शाळेत पाठविणार नाही, असा निर्णय विद्यार्थ्यांच्या पालकांनी घेतला आहे.