अजित पवार यांच्या व्हिडिओचे स्टेटस, किरण सामंत यांचा इशारा कुणाकडे

By मनोज मुळ्ये | Updated: April 10, 2024 17:22 IST2024-04-10T17:22:28+5:302024-04-10T17:22:28+5:30

रत्नागिरी : रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील शिंदेसेनेचे इच्छुक उमेदवार किरण सामंत यांनी व्हॉटसॲपला ठेवलेले स्टेटस पुन्हा चर्चेचा विषय ...

Kiran Samant WhatsApp status of Ajit Pawar is the topic of discussion | अजित पवार यांच्या व्हिडिओचे स्टेटस, किरण सामंत यांचा इशारा कुणाकडे

अजित पवार यांच्या व्हिडिओचे स्टेटस, किरण सामंत यांचा इशारा कुणाकडे

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील शिंदेसेनेचे इच्छुक उमेदवार किरण सामंत यांनी व्हॉटसॲपला ठेवलेले स्टेटस पुन्हा चर्चेचा विषय झाला आहे. लोकसभेला उमेदवार ठरल्यानंतर त्यात मिठाचा खडा आढळला तर विधानसभेला मी कुणाच्या बापाला ऐकणार नाही, हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हिडिओ त्यांनी स्टेटसला ठेवला आहे. त्यामुळे किरण सामंत यांची पुढील भूमिका काय आणि हा इशारा नेमका कुणाला, याचे अंदाज बांधणे सुरू झाले आहे.

शिंदेसेनेकडून या लोकसभा निवडणुकीसाठी किरण सामंत इच्छुक आहेत. त्यांनी आपली इच्छा कधीही लपवलेली नाही. त्यांना उमेदवारी मिळावी, यासाठी शिंदेसेनेने अनेकदा शक्तीप्रदर्शनही केले आहे. अनेकदा मेळावे घेतले आहेत. किरण सामंत यांचा प्रचारही पक्षाकडून केला जात आहे. मात्र अजूनही उमेदवारीबाबत महायुतीकडून कोणताही निर्णय घेण्यात आले नाही.

याआधी किरण सामंत यांनी एकदा आपल्या व्हॉटसॲप स्टेटसला ‘मशाल’ ठेवली होती. त्यावरुन बरीच चर्चा आणि गदारोळ झाला होता. त्यानंतर त्यांनी आपण माघार घेत असल्याचे स्टेटसला ठेवले होते. त्यावरही बरीच चर्चा झाली. मात्र ही दोन्ही स्टेटस त्यांनी काही वेळातच डिलिट केली होती.

आता सामंत यांनी बुधवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हिडिओ स्टेटसला ठेवला आहे. लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जर मला त्यात मिठाचा खडा आढळला तर विधानसभेला मी कुणाच्या बापाला ऐकणार नाही, असे विधान अजित पवार यांनी एका प्रचारसभेत केले आहे. हा व्हिडिओ सामंत यांनी स्टेटला ठेवला असून, त्यावर ‘व्हेरी ट्रू’ अशी आपली प्रतिक्रियाही टाकली आहे.

त्यांच्या या स्टेटसमुळे त्यांची नेमकी भूमिका काय आहे, त्यांनी लोकसभेऐवजी आता विधानसभेवर लक्ष केंद्रीत केले आहे का, त्यांचा हा इशारा कोणाला आहे, अशा प्रश्नांवर चर्चा सुरू झाली आहे.

Web Title: Kiran Samant WhatsApp status of Ajit Pawar is the topic of discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.