खेडचा भोस्ते घाट अखेर ‘डेंजर झोन’ बाहेर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:23 IST2021-05-31T04:23:15+5:302021-05-31T04:23:15+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क संदीप बांद्रे / चिपळूण : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणात भोस्ते घाटातील अवघड वळणावर तयार करण्यात ...

Khed's Bhoste Ghat finally out of 'Danger Zone'! | खेडचा भोस्ते घाट अखेर ‘डेंजर झोन’ बाहेर!

खेडचा भोस्ते घाट अखेर ‘डेंजर झोन’ बाहेर!

लाेकमत न्यूज नेटवर्क

संदीप बांद्रे / चिपळूण : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणात भोस्ते घाटातील अवघड वळणावर तयार करण्यात आलेल्या आरसीसी संरक्षक कठड्यामुळे हा मार्ग ‘डेंजर झोन’मधून बाहेर पडला आहे. मात्र, अजूनही येथे वाहनांचा वेग कमी करण्यासाठी गतिरोधक व अन्य उपाययोजनांची गरज आहे. मात्र, सध्यातरी चौपदरीकरणामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित झाला आहे.

गेल्या अनेक वर्षात महामार्गावरील भोस्ते घाटात झालेल्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. या घाटातील दोन वळणे अतिशय धोकादायक ठरत हाेती. त्यातील एक वळण चौपदरीकरणाच्या कामात मार्ग वळवून कमी करण्यात आले आहे़ मात्र, मुख्य वळण वगळून चौपदरीकरण होऊ शकले नाही. त्यामुळे हे वळण आजही कायम आहे. या वळणाच्या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने प्रवासी आणि चालकांसाठी अतिशय धोकादायक बनले होते. गेल्या तीन वर्षांत याठिकाणी किमान सात ते आठ भीषण अपघात झाले आहेत. तीव्र उतारावर असलेल्या काटकोनी वळणाचा अंदाज येत नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. चौपदरीकरणाचे काम सुरु असतानाही या घटना घडत होत्या. त्यामुळे चौपदरीकरणाचे काम अपघातांना आळा घालण्यासाठी की अपघातांमध्ये वाढ होण्यासाठी, असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, आता हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षित झाला आहे.

मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली चार वर्षे सुरु आहे. कशेडी ते पर्शुराम घाट दरम्यानच्या ४४ किलोमीटरचे काम कल्याण टोलवेज ही कंपनी करत आहे. मात्र, काम करताना अनेक ठिकाणी आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने कंपनी कायम वादात राहिली आहे. आता या कंपनीकडून महामार्गावर सुरक्षिततेच्या काही उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भोस्ते घाटातील अवघड वळणावर आरसीसी संरक्षक कठडा उभारला आहे. तसेच घाटातील दुहेरी मार्गाचे काम पूर्ण झाल्याने आता अपघाताचा धोकाही पूर्णपणे टळला आहे.

------------------------

एकेरी मार्गावर गतिरोधक हवा

भोस्ते घाटातील या अवघड वळणावर वारंवार होत असलेले अपघात रोखण्यासाठी महामार्ग चौपदरीकरणांतर्गत अजूनही काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. चिपळूणहून खेडला येणारी वाहने अतिशय वेगाने येत असल्याने अपघात होतात. आता आरसीसी संरक्षक कठडा उभारल्यानंतर त्यावरही वाहने आदळून अपघात होऊ लागले आहेत. त्यामुळे या एकेरी मार्गावर गतिरोधक उभारण्याची व अन्य उपाययोजना करण्याची गरज आहे.

------------------------

भोस्ते घाटात दुहेरी वाहतूक सुरु झाल्याने आता अपघाताचा फारसा प्रश्न निर्माण होणार नाही. मात्र, अजूनही काही ठिकाणी काँक्रिटीकरण झालेले नाही. तेथे खडी पसरलेली आहे. त्यामुळे पावसाळ्यात त्यापासून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तेव्हा आताच तेथे सरसकट डांबरीकरण किंवा इतर उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच पावसाळ्यात या घाटाकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.

- सुदेश खेडेकर, वाहनचालक

Web Title: Khed's Bhoste Ghat finally out of 'Danger Zone'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.