यंदाही खेड तालुक्यातच खवटी-धनगरवाडीत धावला पाण्याचा पहिला टँकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 16:00 IST2021-04-02T15:58:39+5:302021-04-02T16:00:18+5:30
water shortage Chiplun Ratnagiri- रत्नागिरी जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत असतानाच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. जिल्ह्यात पहिला पाण्याचा टँकर खेड तालुक्यातील खालची धनगरवाडी येथे धावला आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी जिल्हा प्रशासनाचा पहिला टँकर खेड तालुक्यातच धावला आहे.

यंदाही खेड तालुक्यातच खवटी-धनगरवाडीत धावला पाण्याचा पहिला टँकर
रत्नागिरी : जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत असतानाच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. जिल्ह्यात पहिला पाण्याचा टँकर खेड तालुक्यातील खालची धनगरवाडी येथे धावला आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी जिल्हा प्रशासनाचा पहिला टँकर खेड तालुक्यातच धावला आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये डोंगरकपारीत वसलेल्या धनगरवाड्यांमध्ये दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे धनगर वस्त्यांतील जनतेला कळशीभर पाण्यासाठी कित्येक मैल डोंगर-दऱ्यातून पायपीट करावी लागते. येथील लोकांना तर सोडाच, जनावरांनाही पाणी मिळत नसल्याने ती तडफडू लागली आहेत.
फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला होता. तसेच यंदा डिसेंबर महिन्यापर्यंत उशिरा पाऊस सुरू होता. जिल्ह्यात दरवर्षी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडूनही खडकाळ जमिनीमुळे येथे भीषण पाणीटंचाई उद्भवत आहे़. त्यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे़. मात्र, त्याकडे शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे़.
गतवर्षी चिपळूण तालुक्यातील तिवरे गावठाण नवीन वसाहतीमध्ये दि. १२ फेबुवारी २०२० रोजी पहिला टँकर धावला होता. यंदा खेड तालुक्यातील खवटी गावातील खालची धनगरवाडीमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवू लागल्याने लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. खवटी खालची धनगरवाडी हे खेड तालुक्याचे शेवटचे टोक असून रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर तालुक्याला लागूनच हे गाव डोंगरात वसलेले आहे. त्यामुळे येथे दरवर्षी भीषण पाणीटंचाई उद्भवते. उशिरापर्यंत पडलेला पाऊस आणि बंधारे यामुळे यंदा गतवर्षीपेक्षा १८ दिवस उशिरा खवटी खालची धनगरवाडी येथे पहिला टँकर प्रशासनाकडून धावला.
१६ कोटींचा आराखडा
टंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यात ६८ गावांतील १५३ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यंदा १६ कोटी ४३ लाख ३४ हजार रुपयांच्या आराखड्याला शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार शासनाने जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना टँकरने पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.
दूषित पाण्याचा त्रास
रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील स्वरूपानंदनगर येथील २४ विहिरी दूषित पाण्यामुळे दूषित झाल्या होत्या. या दूषित पाण्यामुळे लोकांचे हाल झाले आहेत. त्यासाठी प्रशासनाकडून शिरगाव ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार पाणी पुरवठा करण्यात आला आहे.