Kerala Floods : रत्नागिरीतील मुलांनी खाऊच्या पैशातून केली केरळ आपद्ग्रस्तांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 14:10 IST2018-09-12T14:08:10+5:302018-09-12T14:10:46+5:30
मठ, कुंभारवाडी (ता. रत्नागिरी) येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेतील मुलांनी आपल्या खाऊचे पैसे साठवून जमा झालेल्या २१०० रूपयांचा धनादेश प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अमित शेडगे यांच्याकडे सुपूर्द केला. जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी केलेला हा पहिलाच उपक्रम.

Kerala Floods : रत्नागिरीतील मुलांनी खाऊच्या पैशातून केली केरळ आपद्ग्रस्तांना मदत
रत्नागिरी : मठ, कुंभारवाडी (ता. रत्नागिरी) येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेतील मुलांनी आपल्या खाऊचे पैसे साठवून जमा झालेल्या २१०० रूपयांचा धनादेश प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अमित शेडगे यांच्याकडे सुपूर्द केला. जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी केलेला हा पहिलाच उपक्रम.
जिल्हा प्रशासनाने तसेच सामाजिक संस्थांनीही या राज्याच्या मदतीकरिता जिल्ह्याला आवाहन केले. त्यानुसार अनेक व्यापारी, उद्योजक, संस्था, व्यक्ती पुढे आल्या. तेथे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने अजूनही मदतीची गरज आहे.
मदत कार्यात आता विद्यार्थीही मागे नाहीत. मठ कुंभारवाडी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेतील पहिली ते सातवीच्या ४५ विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊचे पैसे साठविले आणि त्यातून गोळा झालेले २१०० रूपये त्यांनी मुख्याध्यापक संतोष आयरे यांच्याकडे जमा केले.
या रकमेचा बँक आॅफ इंडियाच्या पाली येथील शाखेचा धनादेश जिल्हा प्रशासनाकडे केरळच्या मदतीसाठी सुपूर्द करण्यात आला. उपजिल्हाधिकारी अमित शेडगे यांनी तो स्वीकारला. हा धनादेश देताना शालेय विद्यार्थी स्वराज्य सभेची मुख्यमंत्री समृद्धी साळवी, सांस्कृतिक मंत्री स्नेहा साळुंके तसेच मुख्याध्यापक संतोष आयरे उपस्थित होते.
संस्कारांचा धडा कृतीतून
प्राथमिक शाळांमध्ये आनापान उपक्रमांद्वारे मुलांवर संस्कार घडविण्याचे कार्य केले जाते. मठ, कुंभारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक संतोष आयरे यांच्या मार्गदर्शनाखाली नरेश बने, विजय इरमल, श्रद्धा रसाळ, सुशिला सरगर हे शिक्षक हा उपक्रम राबवतात. त्यामुळेच आम्ही संवेदनशीलपणे विचार करू लागलो. त्यातूनच ही मदत गोळा झाल्याचे समृद्धी साळवीने सांगितले.