दृष्टीआडची रत्नागिरी: केळ्ये येथील काशीविश्वेश्वर काळ्या पाषाणातील सौंदर्य, सातशे ते आठशे वर्षांपूर्वीचे मंदिर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 13:05 IST2024-01-02T13:04:05+5:302024-01-02T13:05:02+5:30
-श्रीवल्लभ माधव साठे रत्नागिरी व कोकण म्हटले की जांभी माती, लाल चिरे आणि समुद्र असे चित्र उभे राहते. आंबे, ...

दृष्टीआडची रत्नागिरी: केळ्ये येथील काशीविश्वेश्वर काळ्या पाषाणातील सौंदर्य, सातशे ते आठशे वर्षांपूर्वीचे मंदिर
-श्रीवल्लभ माधव साठे
रत्नागिरी व कोकण म्हटले की जांभी माती, लाल चिरे आणि समुद्र असे चित्र उभे राहते. आंबे, फणस, मासे आणि कलासंस्कृती सोबतीला असतेच! मात्र आज या प्रतिमेला धक्का देणाऱ्या एका ठिकाणाविषयी लिहीत आहे.
रत्नागिरीच्या उत्तरेला साधारण ८ कि. मी. अंतरावर केळ्ये हे गाव लागते. मजगावमार्गे गावात जाताना सुरुवातीला खाजण लागते. पुढे म्हामूरवाडी व आंबेकोंडकडे जाणारे रस्ते सोडून उजवीकडे वळणारा रस्ता आपल्याला केळ्ये गावातील ठिकवाडीपर्यंत आणतो. येथे काशीविश्वेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. मंदिरालगतच लहान ओढा असून मंदिर कोटबंद आवारात आहे.
कोटाला उत्तर वगळता तिन्ही बाजूस दरवाजे असून, उत्तरेचा भाग ढासळलेला आहे. पूर्वेकडे दरवाजालगत दीपमाळा असून जवळच नंदी मंडप आहे. दक्षिणेकडील दाराबाहेर एक पायऱ्यांची विहीर असून तेथे अस्पष्ट शीलालेख आहे. संपूर्ण कोटातील आवार फरसबंद असून मध्यभागी नागर शैलीत शिखरी पद्धतीने बांधलेले मंदिर आहे. मंदिराचा पाया आणि सभामंडप काळ्या पाषाणात बांधलेला असून, शिखरांचे बांधकाम जांभ्या दगडात केलेले आहे.
असे आहे मंदिर
- मंदिराची रचना मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. सभामंडपात एकसंध दगडी घडीव खांब असून खांबांदरम्यान खालील बाजूस दगडी बैठका आणि वरील बाजूस दगडी महीरपयुक्त कमानी आहेत. खांबांवर पुष्पवेलींची नक्षी दिसते.
- सभामंडप व गर्भगृह यादरम्यान अंतराळ असून तेथे विश्वेश्वराची उत्सवमूर्ती आहे. तसेच कोनाड्यात महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. एक तीन शिरे व चार हात असलेली देवीची मूर्ती असून ती चार घोड्यांच्या रथावर पद्मासनात बसलेली आहे.
- येथील गणपतीची मूर्तीही वैशिष्ट्यपूर्ण असून त्यामध्ये मागील हाताने सोंड पकडलेली आहे. याशिवाय बैलावर बसलेली खड्गधारी चतुर्भुज मूर्तीही दिसते.
- गर्भगृहाच्या दरवाज्याच्या चौकटीवर द्वारपाल व गणेशपट्टी आहे; तर उंबरठ्यावर संगमेश्वर येथील कर्णेश्वर देवळाप्रमाणे नक्षीकाम दिसते. गर्भगृहामध्ये उंच उत्तराभिमुख शाळुंकेवर शिवलिंग असून पाठीमागील कोनाड्यात पार्वतीची मूर्ती आहे.
- मंदिराच्या बाहेरील भिंतीवरही खोल कोनाडे दिसतात. शिखरावर अनेक लहान कळस असून त्यावर गोलाकार अमलक आणि कळस आहे. उत्तरेकडील बाजूस अभिषेकाच्या पाण्यासाठी मकरमुख तयार केलेले दिसते. तसेच मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ 'चंड' राक्षसाचा दगड दिसतो.
मंदिर सातशे ते आठशे वर्षांपूर्वीचे
मंदिराचा इतिहास सुस्पष्ट नसला तरी येथील देसाई सहस्रबुद्धे यांना या गावातील तीन मंदिरांसाठी आदिलशाही काळात सनद मिळालेली होती. त्या आणि वास्तुकलेच्या आधारे हे मंदिर किमान सातशे ते आठशे वर्षे पूर्वीचे असल्याचा अंदाज बांधता येतो. अलिकडील काळात हे मूळ खासगी मंदिर सार्वजनिक वापरासाठी खुले करण्यात आले. मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होतो.
काळ्या दगडातील मंदिर
रत्नागिरी जवळच असलेल्या या मंदिरासोबतच आपण शेजारील लक्ष्मीकांत मंदिरही पाहू शकतो. शहराजवळ असूनही अपरिचित असलेले पण तरीही ग्रामस्थांनी राखलेले हे मंदिर पाहणे हा एक समृद्ध करणारा अनुभव आहेच, पण आसपास काळ्या दगडाच्या खाणी नसताना हे मंदिर बांधकाम झालेले लक्षात येताच आश्चर्याचा सुखद धक्काही बसतो.