रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेतून ५० लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या अपहार प्रकरणातील संशयित शाखाधिकारी किरण विठ्ठल बारये याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे पाेलिस आता त्याचा शाेध घेत आहेत. तर, कॅशिअर ओंकार कोळवणकर याच्यावर शहर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तसेच शिपाई अमोल मोहिते याला न्यायालयीन काेठडी सुनावली आहे.जिल्हा बँकेच्या कर्ला शाखेत कार्यरत असलेल्या संशयित तिघांनी संगनमताने १८ फेब्रुवारी २०२५ ते ४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत तारण ठेवलेल्या नागरिकांचे दागिने बँकेच्या तिजोरीत ठेवताना त्यातील काही दागिने परस्पर लांबविल्याचा प्रकार उघडकीला आला हाेता. त्यांनी ६ महिन्यांमध्ये एकूण ५०४.३४ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरल्याचे पाेलिस तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी शहर पोलिस स्थानकात तिन्ही संशयितांवर गुन्हा दाखल हाेताच बँकेच्या शिपायाला अटक करण्यात आली.त्यानंतर अन्य दोन संशयितांचा शोध घेत असताना शाखाधिकारी यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे शहर पोलिस त्याचा शोध घेत आहेत. तसेच बँकेच्या कॅशिअरवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याचे पाेलिसांनी सांगितले.
Ratnagiri: ५० लाखांच्या अपहार प्रकरणी कर्ला बँकेच्या शाखाधिकाऱ्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, शिपायाला न्यायालयीन कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 15:48 IST