पत्रकार शशिकांत वारिशे हत्याप्रकरण: पंढरीनाथ आंबेरकरचा जामीन अर्ज फेटाळला
By मनोज मुळ्ये | Updated: March 28, 2023 19:06 IST2023-03-28T19:05:32+5:302023-03-28T19:06:40+5:30
७ फेब्रुवारीला आंबेरकरला अटक झाल्यानंतर त्याला अजूनही जामीन मिळालेला नाही.

पत्रकार शशिकांत वारिशे हत्याप्रकरण: पंढरीनाथ आंबेरकरचा जामीन अर्ज फेटाळला
रत्नागिरी : पत्रकार शशिकांत वारिशे हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या पंढरीनाथ आंबेरकर याचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयानेही फेटाळला आहे. ७ फेब्रुवारीला आंबेरकरला अटक झाल्यानंतर त्याला अजूनही जामीन मिळालेला नाही.
दि. ६ फेब्रुवारी रोजी मुंबई गोवा महामार्गावर कोदवली (राजापूर) येथील पेट्रोलपंपानजीक दुचाकीवरुन जाणाऱ्या पत्रकार शशिकांत वारिशे यांचा अपघात झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना कोल्हापूरला हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दुचाकीला धडक देणाऱ्या थार गाडीचा चालक पंढरीनाथ आंबेरकर पोलिसांनी अटक केली. प्राथमिक तपासानंतर त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. त्यानंतर त्याने राजापूर न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज केला. तेथे तो फेटाळण्यात आला. त्यामुळे त्याने जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला. मंगळवारी त्यावर सुनावणी झाली.
जिल्हा सरकारी वकील ॲड. अनिरुद्ध फणसेकर यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. पोलिसांनी केलेल्या तपासाची बाजू त्यांनी समोर ठेवली. दोन तास याबाबतचा युक्तिवाद सुरू होता. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी आंबेरकर याचा जामीन अर्ज फेटाळला.