२८ टक्के बालकांमध्ये जंतदाेष; जंतनाशक गाेळ्या दिल्या का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:37 IST2021-09-14T04:37:27+5:302021-09-14T04:37:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जंतापासून उद्भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात २१ सप्टेंबरला जंतनाशक ...

Jantadesh in 28% of children; Did you give deworming drops? | २८ टक्के बालकांमध्ये जंतदाेष; जंतनाशक गाेळ्या दिल्या का?

२८ टक्के बालकांमध्ये जंतदाेष; जंतनाशक गाेळ्या दिल्या का?

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जंतापासून उद्भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात २१ सप्टेंबरला जंतनाशक मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन आरोग्य विभागाकडून जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

१ ते १९ वर्षे वयोगटांतील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे या उद्देशाने जंतनाशक मोहीम राबविण्यात येत आहे. दरवर्षी शाळेत मुलांना या गोळ्या वाटप करण्यात येत होते. गतवर्षापासून कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, ८ ते १० पर्यंतच्या सुरू असलेल्या काही शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेतच जंतनाशक गोळ्या वाटप करण्यात येणार आहेत.

काय आहे जंतदाेष

जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतांमुळे होतो. २८ टक्के बालकांच्या आतड्यांमध्ये वाढणाऱ्या परजीवी जंतापासून असा कृमी दोष होण्याची शक्यता असते. त्यासाठी आरोग्य विभागाकडून दरवर्षी जंतनाशक गोळ्या वाटपाची मोहीम राबविण्यात येते.

वयाच्या १९ वर्षांपर्यंत द्याव्या लागतात गाेळ्या

ही मोहीम वयाच्या १९ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींसाठी दरवर्षी राबविण्यात येते. वर्षातून दोन वेळा या गोळ्या मुलांना देण्यात येतात. एक वर्षाखालील बालकांना जंतनाशकाची गोळी देण्यात येत नाही. १ ते २ वर्ष वयोगटातील मुलांना जंतनाशकाची अर्धी गोळी देण्यात येते. मुलांना या गोळीची पावडर करूनही दिली जाते.

गाेळ्यांसाठी काेणाकडे संपर्क साधायचा?

शाळेत जाणाऱ्या व शाळेत न जाणाऱ्या सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देण्यात येते. यासोबतच आरोग्य कर्मचारी, आशासेविका, अंगणवाडीसेविका यांच्याकडे संपर्क साधल्यास गोळ्या मिळू शकतात. राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्ताने या गोळ्या वाटप करण्यात येणार आहेत.

मोहीम यशस्वी करणार

जंतनाशक गोळ्या वाटपाची मोहीम यशस्वी करण्यात येणार आहे. त्यामध्ये एकही मूल वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे.

- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, रत्नागिरी.

आराेग्य विभागातर्फे केले जाते वाटप

राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रमानुसार दि. २१ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर, २०२१ अशी जंतनाशक मोहीम राबविणार आहेत.

ज्या मुला-मुलींना २१ सप्टेंबरला जंतनाशक गोळी दिली नसेल त्यांना २८ रोजीच्या मॉप-अप दिनी गोळी द्यावी.

Web Title: Jantadesh in 28% of children; Did you give deworming drops?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.