भारताने तीन मुद्द्यांकडे लक्ष द्यायला हवे
By Admin | Updated: January 13, 2016 21:57 IST2016-01-13T21:57:51+5:302016-01-13T21:57:51+5:30
अनिल काकोडकर : वेळणेश्वर महाविद्यालयात दोन विज्ञान विभागांचे उद्घाटन

भारताने तीन मुद्द्यांकडे लक्ष द्यायला हवे
गुहागर : भारताला नवीन विकासाची क्षितिजे पादाक्रांत करायची असतील तर भारताने शिक्षण, सुविधा व दळणवळण या तीन मुद्द्यांकडे लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी केले.
महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर येथे विद्याप्रसारक मंडळाचे सेंटर फॉर करियर अॅड स्कील डेव्हलोपमेंट आणि कौन्सिल आॅफ सिनिअर सायंटिस्ट या दोन विभागांचे उद्घाटन काकोडकर व प्रसिध्द उद्योगपती दीपक घैसास यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी काकोडकर म्हणाले की, आज आपण ज्ञान युगात वावरत आहोत. या ज्ञान युगात टिकून राहण्यासाठी प्रक्रिया आधारित दृष्टीकोन व व्यावसायिकता यांचा अंतर्भाव करणे आवश्यक आहे. तसेच शिक्षणाकडे संशोधनात्मक दृष्टीकोनातून पाहणे आवश्यक आहे. शिक्षण, उद्योग, संशोधन यांचा एकत्रित असा दृष्टीकोन म्हणजेच होलिस्टिक अॅप्रोच अंगिकारला पाहिजे. शैक्षणिक संस्थांनी शिक्षणात हा सकारात्मक बदल करणे अपेक्षित आहे, असे ते म्हणाले.
भारतातील बहुसंख्य लोक हे आजही खेडेगावात राहतात. शहरातील बेरोजगारांपेक्षा खेड्यातील सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण हे अधिक आहे. त्यासाठी खेडेगावातच उद्योग व तंत्रज्ञान यांचा विकास करणे आवश्यक आहे, असे काकोडकर म्हणाले. अनुभवी शास्त्रज्ञांचा ग्रामीण भागातील विद्यार्थांना फायदा मिळावा, यासाठी विद्या प्रसारक मंडळाने निर्माण केलेले कौन्सिल आॅफ सिनिअर सायंटिस्ट हा उपक्रम खरोखर स्तुत्य आहे. व्याख्याने, प्रकल्प यांच्या माध्यमातून याचा निश्चितच फायदा होईल. आपण सर्वांनी समाजातील या नवीन तंत्रज्ञानाच्या युगाचा अंगिकार केला पाहिजे, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमप्रसंगी उद्योगपती दीपक घैसास यांनी त्यांच्या अनुभवात आलेल्या अनेक गोष्टींचा उल्लेख करून उद्योग, उद्योजकता व उद्योजक यांच्या विविध पैलूंविषयी माहिती सांगितली. चांगला उद्योजक होण्यासाठी अभिजात कल्पकता असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
प्रास्ताविक विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी केले. शिक्षणामुळे कौशल्य असलेले विद्यार्थी तर घडायला हवेतच, पण सुजाण, सुसंस्कृत नागरिक घडणेही आवश्यक आहे. या कार्यक्रमप्रसंगी विविध विज्ञान शाखांच्या महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी कौन्सिल आॅफ सिनिअर सायंटिस्ट या संकल्पनेचे जनक व विद्या प्रसारक मंडळाचे सचिव जयंत कयाल, नातू प्रतिष्ठानचे संचालक डॉ. विनय नातू, महाविद्यालयाचे संचालक डॉ. कमलाकर देसाई, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शिल्पा कामत उपस्थित होत्या.
या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर अभियांत्रिकी शाखेच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थांचे व डॉ. अनिल काकोडकरांचे चर्चा सत्र आयोजित केले होते. बुधवारी दिवसभर विविध वर्षातील अभियांत्रिकी विद्यार्थांसाठी कौन्सिल आॅफ सिनिअर सायंटिस्ट शास्त्रज्ञांची व्याख्याने पार पाडली. या व्याख्यानात डॉ. राजेंद्र आगरकर यांनी आरोग्यविषयक व्याख्यान दिले. (प्रतिनिधी)