अचूक अंदाजासाठी बसविलेल्या ट्रिगरमुळे चुकीचे तापमान, शेतकऱ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 18:27 IST2020-12-04T18:23:18+5:302020-12-04T18:27:38+5:30
Temperature, Farmer, Ratnagiri, Agriculture Sector विमा कंपनीने हवामानाच्या अचूक अंदाजासाठी बसविलेल्या ट्रिगरमुळे चुकीचे तापमान नोंदवले जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने फळपीक विमा योजनेंतर्गत रक्कम विमा कंपनीकडे वर्ग करूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.

अचूक अंदाजासाठी बसविलेल्या ट्रिगरमुळे चुकीचे तापमान, शेतकऱ्यांचे नुकसान
रत्नागिरी : विमा कंपनीने हवामानाच्या अचूक अंदाजासाठी बसविलेल्या ट्रिगरमुळे चुकीचे तापमान नोंदवले जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने फळपीक विमा योजनेंतर्गत रक्कम विमा कंपनीकडे वर्ग करूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.
आंबा पिकासाठी दिनांक १ डिसेंबर २०२० ते १५ मे २०२१ अखेर अवेळी पाऊस, दिनांक १ जानेवारी २०२१ ते १५ मार्च २०२१ अखेर कमी तापमान, १ मार्च २०२१ ते १५ मे २०२१ अखेर जास्त तापमान तसेच १ फेब्रुवारी २०२१ ते ३१ मे २०२१ अखेर गारपीट झाल्यास विमा संरक्षण दिले जाणार आहे.
काजू पिकासाठी १ डिसेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१पर्यंत अवेळी पाऊस, १ डिसेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ अखेर कमी तापमान, १ जानेवारी २०२१ ते ३० एप्रिल २०२१ अखेर गारपीट झाल्यास विमा संरक्षण देण्यात येणार आहे.
आंबा पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी सात हजार रुपये तर काजूसाठी पाच हजार रूपये भरावयाचे आहेत. आंबा पिकाला हेक्टरी एक लाख ४० हजार तर काजूसाठी ३३ हजार ३३३ रूपये विमा संरक्षित रक्कम दिली जाणार आहे. कर्जदार, बिगरकर्जदार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. यावर्षी पावसाळा लांबल्याने अन्य ऋतू लांबण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमधून फळपीक विमा योजनेचे निकष बदलण्याची मागणी होत आहे.
हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर होत आहे. शेतकऱ्यांसाठी फळपीक विमा योजना राबविताना इथल्या वातावरणाचा अभ्यास करून निकष ठरविणे गरजेचे आहे. मात्र, असे होत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. योजनेच्या निकषात बदल करायला हवेत.
- राजन कदम,
बागायतदार, रत्नागिरी.