गोठणेतील प्रकल्पग्रस्तांच्या नावांचा संकलन यादीत समावेश करा, मंत्री उदय सामंत यांचे आदेश
By शोभना कांबळे | Updated: July 29, 2023 19:36 IST2023-07-29T19:34:21+5:302023-07-29T19:36:19+5:30
रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील गोठणे येथील ११८ प्रकल्पग्रस्तांची नावे संकलन यादीत समावेश करावीत, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी ...

गोठणेतील प्रकल्पग्रस्तांच्या नावांचा संकलन यादीत समावेश करा, मंत्री उदय सामंत यांचे आदेश
रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील गोठणे येथील ११८ प्रकल्पग्रस्तांची नावे संकलन यादीत समावेश करावीत, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
चांदोली अभयारण्यामुळे बाधित झालेल्या मौजे गोठणे (ता. संगमेश्वर) येथील प्रकल्पग्रस्तांचे संकलन अद्यावत करण्याबाबत संबंधित विभागाची जिल्हाधिकारी यांच्यासाेबत बैठक आयोजित करावी, अशी मागणी शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना केली होती. त्यानुसार पालकमंत्री सामंत यांनी शनिवारी (२९ जुलै) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.
चांदोली अभयारण्यासाठी बाधित झालेल्या मौजे गोठणे येथील ११८ प्रकल्पग्रस्तांची नावे वाढली आहेत. त्याबाबत प्रकल्पग्रस्तांसमवेत बैठक घेऊन पालकमंत्री सामंत यांनी थेट मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील व विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांच्याशी थेट दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ती नावे तात्काळ यादीत समावेश करण्याचे आणि संबंधितांना निधी देण्याबाबतचा आदेश अपर जिल्हाधिकारी यांना दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला प्रभारी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर आणि प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.