अडरे : चिपळूण तालुक्यातील आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्र, कापरे येथे कर्मचाऱ्यांनी स्वतः बनवलेल्या हर्बल गार्डनचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य तथा रुग्णकल्याण समिती अध्यक्ष मीनल काणेकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
यावेळी काणेकर यांनी कापरे आरोग्य केंद्रातून मिळणाऱ्या विविध सुविधा तसेच कर्मचारी स्वतः मेहनत घेऊन राबवत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांचे काैतुक केले. या उपक्रमाचा परिसरातील नागरिकांना नक्कीच उपयोग होईल, असे गौरवोद्गार काढले. कोरोना महामारीचा सामना करताना आरोग्य केंद्रातील इतर गोष्टींकडे दुर्लक्ष न करता, अधिकारी, कर्मचारी एकजुटीने काम करत आहेत, त्यांचा हा आदर्श घेण्यासारखा आहे, असे काणेकर म्हणाल्या. जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात हर्बल गार्डन हा उपक्रम पहिलाच आहे. सध्या याठिकाणी ५० ते ६० आयुर्वेदिक झाडांची लागवड करण्यात आली असून, टप्प्याटप्प्याने त्यात वाढ करणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. आरोग्य केंद्रातील या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे येणारे रुग्णही कौतुक करत आहेत.