Ratnagiri: अनधिकृत मासेमारीवर ड्रोनची नजर, सागरी सुरक्षाही बळकट होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 16:25 IST2025-01-10T16:24:33+5:302025-01-10T16:25:48+5:30

ड्रोन हे सागरी पोलिस विभागाशी समन्वय साधून वापरण्यात येणार

Implementation of drone based monitoring and digital data maintenance system to monitor illegal fishing boats | Ratnagiri: अनधिकृत मासेमारीवर ड्रोनची नजर, सागरी सुरक्षाही बळकट होणार 

Ratnagiri: अनधिकृत मासेमारीवर ड्रोनची नजर, सागरी सुरक्षाही बळकट होणार 

रत्नागिरी : अनधिकृत मासेमारी नौकांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन आधारे देखरेख व डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्र प्रणाली राबविण्यास गुरुवारपासून सुरुवात झाली. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मुंबई येथील आयुक्त कार्यालयात नियंत्रण कक्षाचेही उद्घाटन करण्यात आले. परप्रांतीय मच्छीमारांमार्फत महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात होत असलेल्या अवैध मासेमारीवर चाप लागणार आहे. तसेच सागरी सुरक्षाही बळकट होणार आहे.

यापुढे पालघरमधील शिरगाव, ठाण्यामधील उत्तन, मुंबई उपनगरातील गोराई, मुंबई शहरमधील ससून गोदी, रायगडमधील वर्सोली व श्रीवर्धन, रत्नागिरीमधील भाट्ये व मिरकरवाडा, सिंधुदुर्गमधील देवगड या नऊ ठिकाणांवरून ड्रोनद्वारे देखरेख होणार आहे. येथील भाट्ये समुद्रकिनारी अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर ड्रोन हवेत समुद्रावर झेपावला.

याप्रसंगी मत्स्य व्यवसाय सहायक आयुक्त आनंद पालव उपस्थित होते. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी करण्यात आले होते. महाराष्ट्रातील पारंपरिक मच्छीमारांचे हित जोपासण्यासाठी तसेच परप्रांतीय मच्छीमारांमार्फत महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात होत असलेल्या अवैध मासेमारी रोखण्यासाठी असलेल्या कायद्यांतर्गत प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता विभागाकडे असलेल्या गस्ती नौकांद्वारे गस्त घालून कार्यवाही करण्यात येत असते.

गस्तीनौकेद्वारे समुद्रामध्ये गस्त घालत असताना प्रत्येक नौकेची तपासणी करणे शक्य होत नाही; पण ड्रोनच्या वापरामुळे नियंत्रण राखण्यास मदत होईल. ड्रोनचा वेग जास्त असल्यामुळे एकाच वेळेस अधिक क्षेत्र ड्रोनद्वारे देखरेखीखाली येईल. तसेच ड्रोनचा वापर करून मासेमारी नौकांची मॅपिंग करून झाल्यावर अनधिकृत मासेमारी नौकांची माहिती विभाग सुलभरीत्या उपलब्ध होऊ शकेल. ड्रोन हे सागरी पोलिस विभागाशी समन्वय साधून वापरण्यात येणार आहे.

ट्रॉलर नेटद्वारे मासेमारी, पर्ससिन पद्धतीने मासेमारी, गिल नेट पद्धतीने मासेमारी, एलइडी/डायनामाईट/रसायने वापरुन करण्यात येणारी अवैध पद्धतीची मासेमारी, नोंदणीकृत नौका क्रमांक, नाव व जिल्ह्याचा कलर कोड यांची नोंद नसलेल्या मासेमारी नौका, पावसाळी बंदी कालावधी (१ जून ते ३१ जुलै)मध्ये अवैधरित्या मासेमारी करत असलेल्या यांत्रिक नौकांची (मोटाराइज/मेकॅनाइज) तपासणी, हवामान इशारे तसेच अवैध बाबीबर संबंधित अंमलबजावणी अधिकारी कारवाई करू शकतील.

कर्नाटकातील मलपी येथील अतिक्रमण करणाऱ्या मासेमारी नौकेवर कारवाई करत ताब्यात घेणाऱ्या नौका विभागाच्या कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Web Title: Implementation of drone based monitoring and digital data maintenance system to monitor illegal fishing boats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.