‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ अभियानाची तळवडेत अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:32 IST2021-05-07T04:32:46+5:302021-05-07T04:32:46+5:30
पाचल : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राजापूर तालुक्यातील तळवडे ग्रामपंचायतीतर्फे ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या अभियानाचा ...

‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ अभियानाची तळवडेत अंमलबजावणी
पाचल : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राजापूर तालुक्यातील तळवडे ग्रामपंचायतीतर्फे ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. सरपंच प्रदीप प्रभुदेसाई यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ राववाडी येथून करण्यात आला.
यावेळी ग्राम कृती दलाचे अध्यक्ष संदीप बारसकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संतोष मसुरकर, सुरेश गुडेकर, आरोग्य सेवक, तलाठी विकास भंडारी, शिक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका उपस्थित होते. हे अभियान १ ते १५ मे या कालावधीत राबविण्यात येणार आहे. कोरोनाचा बिमोड करण्यासाठी गावात या अभियानाची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक घराघरात जाऊन कोरोनाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य सेवक, ग्रामपंचायत सदस्य, ग्राम कृती दलाचे सदस्य, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक, तलाठी आदींचे पथक घराघरात जाऊन तपासणी करणार आहेत. यामध्ये तापमान, ऑक्सिजनचे प्रमाण, मास्क, सॅनिटायझर व स्वच्छतेबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.