लाेकमत न्यूज नेटवर्क
दापाेली : बांधतिवरे नदीवरील वाढीव हर्णै प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलशेजारीच बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याने हर्णै सुकाणू समितीने अवैध उत्खनन थांबविण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. काम थांबले नाही, तर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. हर्णै प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेला हानी पोहोचवाल तर याद राखा, असा इशारा सुकाणू समिती अध्यक्ष सोमनाथ पावसे यांनी दिला आहे.
बांधतिवरे नदीवर हर्णै, पाजपंढरी, अडखळ आणि शिवाजीनगर या चार संयुक्त ग्रामपंचायतींमार्फत प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सुरू आहे. ज्या ठिकाणी या योजनेचा मुख्य जॅकवेल आहे, त्याच्याशेजारी गिम्हवणे ग्रामपंचायतीने अवैध उत्खनन सुरू केल्याचा आरोप सुकाणू समितीने केला आहे. तत्काळ हे काम थांबवावे, अशा स्वरूपाची मागणी दापोलीचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे गिम्हवणे वनंद यांनी सुरू केलेल्या नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाला सुकाणू समितीने हरकत घेतली आहे. हे काम थांबविण्याची मागणी सुकाणू समितीचे अध्यक्ष सोमनाथ पावशे, उपाध्यक्ष जहुर कोंडविलकर, भास्कर दोरकुळकर, राजेंद्र चौगुले, महेश मेहंदळे यांनी केली आहे.
काेट
गिम्हवणे ग्रामपंचायतीने सुरू केलेले अवैध उत्खनन तत्काळ थांबवावे, अन्यथा आम्हाला कायदेशीर मार्गाने जावे लागेल. तसेच हे उत्खनन थांबले नाही, तर आम्ही आमचा हक्क मागण्यासाठी रस्त्यावर उतरू. वेळप्रसंगी चारही गावांतील लोक तहसील कार्यालयावर धडक देतील.
- सोमनाथ पावसे, अध्यक्ष, सुकाणू समिती
काेट
चार गावांना पाणीपुरवठा होणाऱ्या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेला धक्का लावून आमच्या हक्काचे पाणी कोणी हिरावून घेऊ पाहत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही. गिम्हवणे ग्रामपंचायतीने अवैध उत्खनन थांबवावे. आमच्या हक्काच्या पाण्यावर कोणी गदा आणू पाहत असेल, तर या पाच गावांतील जनता स्वस्थ बसणार नाही. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरायला सुद्धा आम्ही मागे हटणार नाही.
- राजेंद्र चौगुले