प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनेचे रत्नागिरीत उपाेषण
By मेहरून नाकाडे | Updated: February 13, 2024 16:00 IST2024-02-13T15:58:18+5:302024-02-13T16:00:41+5:30
रत्नागिरी : एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेतर्फे मंगळवारी ( दि. १३) विभागिय कार्यशाळेसमोर पदाधिकारी ...

प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनेचे रत्नागिरीत उपाेषण
रत्नागिरी : एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेतर्फे मंगळवारी ( दि. १३) विभागिय कार्यशाळेसमोर पदाधिकारी बेमुदत उपाेषणाला बसले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, घरभाडे भत्त्याची व वार्षिक वेतनवाढीची वाढीव दराची थकबाकी देण्याबाबत १५ दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री यांच्या उपस्थितीत मान्यताप्राप्त कामगार संघटनेसमवेत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे मान्य केले होते; परंतु ४ महिन्यांचा कालावधी संपूनही अद्याप बैठक झालेली नाही; तसेच सन २०१६ ते २०२० च्या कामगार करारासाठी शासन/प्रशासनाने एकतर्फी जाहीर केलेल्या ४ हजार ८४९ कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप, पाच हजार, चार हजार, २,५०० मूळ वेतनात दिलेल्या वाढीमुळे सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनातील विसंगती दूर करून सरकसकट पाच हजार रुपये देण्यात यावे, या मागण्यांवर संघटना ठाम आहे.
सर्व प्रलंबित आर्थिक मागण्यांच्या सोडवणुकीसाठी संघटनेतर्फे उपोषणाचा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप शिंदे व जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी दिला होता. त्यानुसार रत्नागिरी विभागिय कार्यशाळेसमोर कामगार संघटनेचे रत्नागिरी विभागिय अध्यक्ष राजेश मयेकर, सचिव रवि लवेकर, कार्याध्यक्ष शेखर सावंत, खजिनदार अमित लांजेकर तसेच अन्य आगाराचे पदाधिकारी उपोषणास बसले आहेत. शासनाने योग्य निर्णय न घेतल्यास उपोषण कायम करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.