‘किसान ॲप’चे वरातीमागून घोडे; वादळ-वारे येऊन गेल्यानंतर अलर्ट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:35 IST2021-05-25T04:35:30+5:302021-05-25T04:35:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शेतीविषयक सरकारी योजना, तसेच गरजेनुसार माहिती पुरविणे व शेतीविषयक योग्य निर्णय घेण्यास शेतकऱ्यांना मदत ...

‘किसान ॲप’चे वरातीमागून घोडे; वादळ-वारे येऊन गेल्यानंतर अलर्ट!
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शेतीविषयक सरकारी योजना, तसेच गरजेनुसार माहिती पुरविणे व शेतीविषयक योग्य निर्णय घेण्यास शेतकऱ्यांना मदत करणे या हेतूने किसान ॲप शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आले असून, शेतकरी त्याचा वापरही करीत आहेत. हवामानाचा अंदाजही या ॲपद्वारे कळविण्यात येतो. मात्र, हवामानाच्या संदेशाबाबत अपडेट नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नुकत्याच झालेल्या चक्रीवादळाविषयीची माहिती ॲपपूर्वीच अन्य माध्यमाद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहाचली होती.
भारतीय हवामान खात्यातर्फे हवामानातील बदलाचे वर्तविण्यात आलेले अंदाज आतापर्यंत तंतोतंत खरे ठरले आहेत. त्यामुळे चक्रीवादळाविषयी हवामान खात्याचे संदेश सोशल मीडिया, तसेच अन्य माध्यमातून तत्काळ शेतकरी, मच्छिमारापर्यंत पोहोचले होते. प्रशासनानेही सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर शेतकरी सजग झाले. किसान ॲपवरील हवामानाविषयीचा संदेश उशिरा प्राप्त झाल्याने शेतकरी मात्र हिरमुसले गेले.
शासनाने शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती देण्यासाठी ‘किसान ॲप’ सुरू केले आहे. या ॲपवर शेतकऱ्यांसाठी आवश्यक चांगल्या गोष्टींची माहिती मिळते. मात्र, अनेक वेळा हवामानातील बदल व हवामान खात्याने वर्तविलेले अंदाज याबाबतची माहिती उशिरा प्राप्त होते. तत्पूर्वी सोशल मीडिया व अन्य माध्यमांतून प्राप्त होत असते. त्यामुळे हवामानाच्या अंदाजाबाबत अपडेट असणे आवश्यक आहे.
- किसन देसाई,
शेतकरी, जाकादेवी.
शेतकरी व मच्छिमारांसाठी हवामानातील बदलाची माहिती उपयुक्त आहे. किसान ॲप तर शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आले असून, या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना निर्णय घेणे सोपे होते. मात्र, हवामानातील बदलाबाबतच्या सूचना किंवा संदेश उशिरा प्राप्त होतात. वादळ येऊन गेल्यावर संदेश देण्याऐवजी येण्यापूर्वी माहिती मिळाली तर शेतकरी जागृत होतील, आवश्यक उपाययोजना करू शकतील.
- राजन कदम,
शेतकरी, रत्नागिरी.
बाजारातील उत्पादने, बियाणे, खते व त्यांची उपलब्धता शिवाय किंमत ॲपच्या माध्यमातून सहज उपलब्ध होते. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेल्या विविध सरकारी योजनांची माहितीही या ॲपद्वारे प्राप्त होत आहे. मात्र, हवामानातील बदलाबाबत अपडेट नसल्यामुळे संदेश अन्य माध्यमांतून माहिती पोहोचल्यावर प्राप्त होतात. हा बदल होणे आवश्यक आहे. ज्यामुळे ॲपकडे शेतकरी आकृष्ट होतील
- रईस नाकाडे,
शेतकरी, नेवरे.
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणारे ॲप
शेतकऱ्यांना आवश्यक माहिती ॲपच्या माध्यमातून पुरवित असतानाच शेतीविषयक योग्य निर्णय घेण्यासाठी मदत व्हावी यासाठी किसान ॲप तयार करण्यात आले आहे. प्रयोगशील शेतकरी या ॲपचा वापर करीत असून, आधुनिक तंत्रज्ञान किंवा शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून अधिकाधिक उत्पादन मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठेची माहिती उपलब्ध होत आहे.
- शिवराज घोरपडे,
जिल्हा कृषी अधीक्षक, रत्नागिरी.
किसान ॲपवर काय मिळते माहिती?
शेतीविषयक सरकारी योजनांची माहिती व त्याचे फायदे
१३०० बाजारातील ४५० प्रकारच्या पिकांविषयी माहिती मिळते.
बी-बियाणांसह खतांची उपलब्धता व बाजारातील किमती
हवामानाचा अंदाज, गरजेनुसार शेतकऱ्यांना माहिती पुरविणे
अपडेट वेळेवर मिळावे,
हवामानातील बदलांबाबत संदेश देत असताना अपडेट देण्यात यावेत.
विविध बाजारपेठा, तसेच पिकांविषयी माहिती मिळत असली तरी त्यामध्ये अपडेट असावेत.
खते, बियाणे, अवजारे यांच्या सुधारित किमती, सरकारी अनुदान याबाबत माहिती गरजेची आहे़