Divyang - अपंगत्वावर मात करून त्याची तेजस कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 05:52 PM2020-12-03T17:52:09+5:302020-12-03T17:54:06+5:30

Divyang , Disability Development, ratnagiri जन्मत: अस्थिव्यंगाने ग्रस्त असलेल्या तेजसचे पालनपोषण करताना पालकांना विशेष काळजी घ्यावी लागली. मात्र, आपल्या दिव्यांगत्वावर मात करून तेजसने पोल्ट्री व्यवसाय सुरू केला आहे.

His brilliant performance overcoming disability | Divyang - अपंगत्वावर मात करून त्याची तेजस कामगिरी

Divyang - अपंगत्वावर मात करून त्याची तेजस कामगिरी

Next
ठळक मुद्देअपंगत्वावर मात करून त्याची तेजस कामगिरी

मेहरून नाकाडे

रत्नागिरी : जन्मत: अस्थिव्यंगाने ग्रस्त असलेल्या तेजसचे पालनपोषण करताना पालकांना विशेष काळजी घ्यावी लागली. मात्र, आपल्या दिव्यांगत्वावर मात करून तेजसने पोल्ट्री व्यवसाय सुरू केला आहे.

कशेळी येथील सर्वसामान्य घरातील तेजस दशरथ फोडकर याचे वडील मजूर तर आई गृहिणी आहे. अन्य मुलांमध्ये तेजस मिसळू शकत नव्हता. पालकांना त्याची सातत्याने काळजी घ्यावी लागत होती. अभ्यासात प्रगती असल्याने त्याने दहावीनंतर कला शाखेत प्रवेश घेतला. दोन वर्षांपूर्वी त्याने बारावी पूर्ण केली. त्यानंतर मात्र तो घरीच होता. त्याच कालावधीत रत्नागिरी पॅराप्लेजिकल फाऊंडेशनचे सादिक नाकाडे यांच्याशी तेजसची ओळख झाली.

तेजसशी भेट झाल्यानंतर सादिक यांनी त्याला आत्मनिर्भर होण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ घेण्यास सुचविले. तेजसने त्याचक्षणी स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा निर्धार केला. गेल्यावर्षी त्याने पोल्ट्री व्यवसाय सुरू केला असून, व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

अपंगासाठी धडपड

सादिक नाकाडे यांच्याशी बोलल्यानंतर तेजसला प्रेरणा मिळाली. त्यामुळे तेजसने दिव्यांगांसाठी कार्यरत राहण्याचा निर्धार केला आहे. दिव्यांगानी कुढत न बसता, विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन आत्मनिर्भर होणे आवश्यक असून, त्यासाठीच तेजस धडपडत आहे. दिव्यांगांवर सहानुभूती दाखविण्यापेक्षा त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत.

व्यवसाय वाढविणार

तेजसने गावठी कोंबड्या विक्रीपासून सुरूवात केली. सध्या तो बॉयलरबरोबर गावठी कोंबड्यांची विक्री करीत आहे. कोंबड्या खरेदी-विक्रीपासूनचे सर्व व्यवहार तो सांभाळत आहे. वर्षभरात व्यवसायातील खाचखळगे त्याला कळले असून, त्याने न खचता व्यवसाय वाढविण्याचा निर्धार केला आहे. शिवाय अन्य व्यवसाय करण्याचीही त्याची तयारी सुरू असून, त्याकरिता प्रयत्नशील आहे.


सामान्य कुटुंबात जन्माला आल्याने परिस्थितीचा सामना करण्याचे बाळकडू जन्मत: प्राप्त झाले आहे. दिव्यांगत्त्वाने कुढत न बसता जमेल तसे प्रयत्न करून स्वावलंबी व्हावे, अशी धारणा आहे. सादिकभाई मला प्रेरणादायी असल्याने यापुढे माझ्यासारख्या दिव्यांगांसाठी कार्यरत राहण्याची ईच्छा आहे.
- तेजस फोडकर

Web Title: His brilliant performance overcoming disability

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.