Local Body Election Voting: रत्नागिरी जिल्ह्यात ५८.३१ टक्के मतदान, गुहागरमध्ये सर्वाधिक
By शोभना कांबळे | Updated: December 2, 2025 13:28 IST2025-12-02T13:26:45+5:302025-12-02T13:28:01+5:30
शेवटच्या दोन तासात मतदानाचा टक्का वाढेल की कमी होईल याची उत्सुकता

Local Body Election Voting: रत्नागिरी जिल्ह्यात ५८.३१ टक्के मतदान, गुहागरमध्ये सर्वाधिक
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगर परिषदा आणि तीन नगरपंचायती अशा सात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज, मंगळवारी सकाळी ७.३० वाजता मतदानाला प्रारंभ झाला. ११.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात ३०.८९ टक्के मतदान झाले. २२,१३४ पुरूष आणि १९,६४१ महिला तसेच अन्य एक अशा एकूण ४१,७७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या वेळेत गुहागरात ४६.४७ टक्के सर्वाधिक मतदान झाले आहे. रत्नागिरीत सर्वात कमी २१.९३ टक्के मतदान झाले.
जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, खेड आणि चिपळूण या चार नगरपरिषद आणि गुहागर, देवरूख आणि लांजा या नगरपंचायतीसाठी मोठ्या चुरशीने मतदानाला सुरुवात झाली आहे. सुरूवातीपासून मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सकाळी ९.३० वाजता १४.२६ टक्के मतदान झाले. सकाळी ११.३० वाजता सात पालिका क्षेत्रातील १ लाख ६० हजार ४४८ मतदारांपैकी ४१ हजार ७७६ मतदारांनी मतदान केले आहे. यापैकी पुरुष २२ हजार १३४ आणि महिला १९ हजार ६४१ तसेच अन्य १ मतदाराने मतदानाचा हक्क बजावला आहे. सरासरी ३०.८९ टक्के मतदान झाले आहे.
दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५८.३१ टक्के मतदान
दुपारी ३.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५८.३१ टक्के मतदान झाले. या मतदानात आता महिलांची आघाडी असून ४२ हजार ३७४ महिलांनी आणि ४० हजार ९०७ पुरूषांनी तसेच अन्य एका मतदाराने अशा एकूण ८३ हजार २८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या टप्प्यातही गुहागरने आघाडी घेतली असून सर्वाधिक ६९.१२ टक्के मतदान झाले आहे. रत्नागिरी वगळता सर्वच पालिकांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले असून रत्नागिरीत ४४.८२ टक्के मतदान झाले आहे. शेवटच्या दोन तासात मतदानाचा टक्का वाढेल की कमी होईल, ही उत्सुकता नागरिकांना लागून राहिली आहे.
११.३० वाजेपर्यंत सात पालिकांतील मतदान टक्केवारी
पालिका / मतदानाची टक्केवारी
- रत्नागिरी / २१.९३
- चिपळूण / २४.०२
- खेड / २८.१
- राजापूर/ ३०.२८
- लांजा / ३२.६
- देवरूख / ३२.८६
- गुहागर / ४६.४७
दुपारी १.३० वाजेपर्यंत ४६.६४ टक्के मतदान
मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली आहे. दुपारी १.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात ४६.६४ टक्के मतदान झाले. गुहागरात सर्वाधिक ६१.२८ टक्के मतदान झाले असून रत्नागिरीत सर्वात कमी मतदान आहे. दुपारपर्यंतचे मतदान वेगाने झाले आहे.
पालिका / मतदानाची टक्केवारी
- रत्नागिरी / ३४.२५
- चिपळूण / ३९.०२
- खेड / ४१.३४
- राजापूर/४९.७४
- लांजा / ४९.११
- देवरूख / ५१.७७
- गुहागर / ६१.२८
दुपारी ३.३० वाजेपर्यंत सात पालिकांतील मतदान टक्केवारी
पालिका / मतदानाची टक्केवारी
- रत्नागिरी / ४४.८२
- चिपळूण / ५१.२६
- खेड / ५२.५
- राजापूर/६४.३४
- लांजा / ६१.५७
- देवरूख / ६४.५५
- गुहागर / ६९.१२