रत्नागिरी : मंगळवारी दिवसभर कोसळलेल्या मुसळधार, वादळी पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले, पूर आला. झाडे कोसळली. यामुळे जिल्ह्यात अनेक घरे, गोठे, संरक्षक भिंती आदींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. या एका दिवसाच्या पावसाने २७ लाखांपेक्षा अधिक रकमेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. दापोली तालुक्यात सर्वाधिक १४.७९ लाख रूपये इतके नुकसान झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार वाऱ्यांसह पावसाने मुसळधारेने पडण्यास सुरूवात केली आहे. मंगळवारी अगदी पहाटेपासूनच पावसाचा वाऱ्यासह जोर कायम होता. त्यामुळे जिल्ह्यात खेड, चिपळूण, राजापूर या शहरांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. इतर तालुक्यांमध्येही पावसाचा फटका बसला. त्यामुळे घरे, गोठे, संरक्षक भिंती कोसळणे, रस्ते खचणे आदी प्रकार सुरू झाले. मंगळवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे अनेक घरांमध्ये, गोठ्यांमध्ये पाणी भरले, वाऱ्यानेही काही घरे, गोठे कोसळले. काहींच्या घरावर झाड कोसळल्याने नुकसान झाले.जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान दापोली तालुक्यात झाले आहे. तालुक्यातील केळशी येथील महेंद्र मोहरा यांच्या कंपनीत पाणी भरल्याने कंपनीचे साडेपाच लाखांचे नुकसान झाले आहे. तर, दापोलीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या संरक्षक भिंतीचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील शिरवणे येथील गावदेवीच्या सहाणेच्या इमारतीवर झाड पडल्याने दीड लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अनेक घरे, गोठे, सुपारी बाग आदींचे नुकसान झाले आहे.तसेच संगमेश्वर तालुक्यात ३ लाख ८१ हजार आणि रत्नागिरी तालुक्यात ३ लाख ७२ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. अन्य तालुक्यांमध्येही नुकसान झाले असून, त्यांचेही पंचनामे सुरू आहेत. सर्व तालुक्यांमधील नुकसानाचा २७ लाख ३८ हजार १७० रुपये इतका प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून, लांजा तालुक्यात पंचनामे सुरू आहेत.
तालुके अंदाजे नुकसान
- मंडणगड - १,७४,०००
- दापोली - १४,७९,३००
- खेड - १,६४,९५०
- गुहागर - ५६,७५०
- चिपळूण - ६१,१००
- संगमेश्वर - ३,८१,०७०
- रत्नागिरी - ३,७२,५००
- लांजा - पंचनामे सुरू
- राजापूर - ४८,५००
- एकूण - २७,३८,१७०