अक्षय तृतीयेला हापूसची चव महागच; सध्या दर किती.. वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 17:01 IST2025-04-30T17:00:19+5:302025-04-30T17:01:01+5:30
दरातील घसरण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

संग्रहित छाया
रत्नागिरी : वाढत्या उष्णतेने आंबा लवकर तयार होत असल्यामुळे बाजारातील आवक वाढली आहे. आवक वाढल्यामुळे आंब्याच्या दरात घसरण झाली आहे. सध्या हजार ते दोन हजार रुपये इतका पेटीचा दर आहे. दरात झालेली ही घसरण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचीच आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेला आंब्याचा मुहूर्त करणाऱ्यांना त्याची चव महागच पडणार आहे.
यावर्षी एकूणच आंबा उत्पादन कमी आहे. त्यातच बाजारातील दर घसरल्यामुळे बागायतदारांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. दरवर्षी एप्रिलच्या ३० तारखेपर्यंत मुंबई बाजारपेठेतील दर अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत टिकून असतात, यावर्षी आधीच दर घसरले आहेत. या उत्पन्नातून खत व्यवस्थापनासह मजुरी, वाहतूक, पॅकिंग यासाठी होणारा खर्चही निघू शकणार नाही.
दरवर्षी अनेकजण अक्षय तृतीयेला आंब्याचा मुहूर्त करतात. मात्र, यावर्षी अजूनही आंब्याचे दर न परवडणारे असेच आहेत. त्यामुळे यावर्षी चढ्या दरानेच आंबा खरेदी करुन मुहूर्त करावा लागणार आहे.
पावसामुळे संकट
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस पडला, त्यानंतर वाढलेल्या उष्म्यामुळे आंबा झाडावरच पिकू लागला आहे. त्यामुळे बागायतदारांचे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी आंबा पिकून गळून पडत आहे.
मुंबईतील दरात घसरण
मुंबई येथील वाशी बाजारपेठेत पेटीला हजार ते दोन हजार रुपये दर दिला जात आहे. मात्र, काही बागायतदारांनी व्यापाऱ्यांकडून पैसे ॲडव्हान्स घेतल्यामुळे त्यांना मुंबईत आंबा विक्रीसाठी पाठवावा लागत आहे. पेटीमागे हजार ते बाराशे रुपयांचे नुकसान होत आहे.
स्थानिक बाजारात दर
सध्या स्थानिक बाजारात ५०० ते ७०० रुपये डझन दराने आंबा विक्री सुरू आहे. मुंबई बाजारपेठेत दर गडगडलेले असले तरी स्थानिक बाजारात दर चांगला आहे. मात्र, स्थानिक बाजारात मुंबईप्रमाणे ग्राहकसंख्या नसल्याने विक्रीवर मर्यादा येत आहे.
सध्याचे वाशी बाजारपेठेतील दर परवडणारे नाहीत. एका पेटीला येणारा खर्च व मिळणारा दर यामध्ये कमालीचा फरक आहे. त्यामुळे यावर्षी बँकांची कर्ज परतफेड, मजूर, कीटकनाशकांची बिले भागविणे अवघड होणार आहे. पुन्हा एकदा आर्थिक गणित विस्कटणार आहे. -राजन कदम, बागायतदार