सरकार मजबूत, मध्यावधीची चर्चा कशाला? - उद्योगमंत्री उदय सामंत
By मनोज मुळ्ये | Updated: April 1, 2023 15:32 IST2023-04-01T15:31:50+5:302023-04-01T15:32:12+5:30
जागा वाटप करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघेही सक्षम नेते

सरकार मजबूत, मध्यावधीची चर्चा कशाला? - उद्योगमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : ज्यावेळी राजकारण अस्थिर असते, तेव्हा मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता असते. पण १७२ संख्याबळ जर शिंदे - फडणवीस यांच्यासोबत आहे, तर राजकीय अस्थिरतेचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांची चर्चा करायचीच कशाला, असे मत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
राज्यात सातत्याने राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. वातावरण बिघडले असल्याने मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न सामंत यांना करण्यात आला. त्यावर आधी सामंत यांनी वातावरण बिघडलंय म्हणजे काय, असा मिश्किल प्रतिप्रश्न केला. १७२ लोक जर शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत असतील तर अस्थिरतेचा प्रश्न कुठे आला? त्यामुळे मध्यावधी निवडणुका होण्याची कोणतीही शक्यता नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
भाजपकडून शिंदे गटाला ४८ जागा दिल्या जातील, याबाबतच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, कुठलाही पक्ष आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत सर्वच्या सर्व जागा लढवण्यावरच चर्चा करतोच. त्यात गैर काहीच नाही. त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही. जागा वाटप करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघेही सक्षम नेते आहेत. ते त्याबाबतचा निर्णय घेतील. यापुढील सर्व निवडणुका शिवसेना आणि भाजप युती म्हणूनच लढवल्या जातील, असेही ते म्हणाले.