शासकीय रुग्णालयांची झोळी दुबळी...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST2021-05-28T04:23:39+5:302021-05-28T04:23:39+5:30
कोरोनाच्या महामारीत शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय टीम महत्त्वपूर्ण आरोग्य सेवा देत आहे. अशा परिस्थितीत रूग्णालयातील सोयी-सुविधांची कमतरता भासू नये, यासाठी ...

शासकीय रुग्णालयांची झोळी दुबळी...!
कोरोनाच्या महामारीत शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय टीम महत्त्वपूर्ण आरोग्य सेवा देत आहे. अशा परिस्थितीत रूग्णालयातील सोयी-सुविधांची कमतरता भासू नये, यासाठी त्या-त्या भागातील विविध सामाजिक संस्था व व्यक्ती सढळहस्ते मदत करत आहेत. चिपळुणातील कामथे रुग्णालयात याआधी एक्स-रे मशीन, ड्युरा सिलिंडर अशी यंत्रणा पुरविण्यात आली. त्यानंतर ७० ऑक्सिजन बेडसह सीसीटीव्ही, औषध साहित्य, रूग्णालय स्वच्छता, जेवणाचे डबेही पुरवले जात आहेत. एवढेच नव्हे तर काहींनी स्वच्छतागृहासाठी ब्रश, बादल्या दिल्या. बोअरवेल खोदाईतही योगदान दिले. लोकसहभागातून सारे काही दिले जात आहे. मात्र, ज्या पद्धतीने वैद्यकीय यंत्रणा योगदान देत आहे, त्यापद्धतीने रुग्णालयाची प्रशासकीय यंत्रणा काम करत नाही. त्यामुळे डॉक्टरांनाच उपचाराचे काम सोडून अन्य गोष्टींकडे लक्ष द्यावे लागत आहे. कोरोनाच्या परिस्थितीत रुग्णालयातील व परिसरातील कचऱ्याच्या साफसफाईसाठी सामाजिक संस्था व कार्यकर्ते लक्ष घालत असतील आणि महिन्याला सुमारे ९० हजार रूपये इतके बिल घेणारा ठेकेदार जबाबदारी झटकत असेल, तर त्यावर प्रशासनाचे नियंत्रण असायला हवे होते. त्याला साधे पत्र नाही, नोटीस बजावली नाही की कारवाई केली नाही. केवळ कागदोपत्री सोपस्कार सुरु आहेत. हाच गोंधळ रुग्णालयातील अन्य सुविधांच्या बाबतीत घडत आहे. शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणेसोबत प्रशासकीय यंत्रणा सक्षम होणे गरजेचे आहे. एकाच रथाची ही दोन चाकं असल्याने ते सोबत राहणे गरजेचे आहे. तरच शासकीय रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांना चांगले उपचार व सोयी उपलब्ध होतील. कोविड निधीच्या माध्यमातून शासकीय रुग्णालयांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत आहे. तरीही बदल घडत नसेल, तर दुर्दैव आहे. नेमका हा निधी मुरतो कुठे, असा प्रश्न अनेकांना पडू लागला आहे. यापुढे मदतीसाठी हजारो हात पुढे आले, तरी शासकीय रुग्णालयाची झोळी दुबळीच राहणार आहे का, असाही प्रश्न प्रत्येकाला पडू लागला आहे. शासकीय रुग्णालयातील वीज, पाणी यासारख्या त्रुटी दूर करण्यासाठीही सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधींची मदत वेळोवेळी घ्यावी लागत आहे. परंतु, ही कामे त्या-त्या वेळी मार्गी लावण्यासाठी रुग्णालयातील प्रशासन अथवा व्यवस्थापनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. किमान तसा प्रस्ताव पाठविण्याची गरज आहे. परंतु, दुर्दैवाने याही गोष्टी होत नसल्याने आज शासकीय रुग्णालयांची स्थिती बिकट बनली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालये बदनाम होण्यामागे केवळ वैद्यकीय यंत्रणा नव्हे, तर प्रशासनही तितकेच जबाबदार आहे.
- संदीप बांद्रे