गुहागर : गुहागर तालुक्यातील नरवण व बोऱ्या येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून गोवा बनावटीचे मद्य आणि त्याच्या वाहतुकीसाठी वापरली जाणारी नंबर प्लेट नसलेली कार असा ७ लाख ४७ हजार ५६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुहागर तालुक्यातील नरवण येथे गोवा बनावट विदेशी मद्यसाठा करण्यात आला असल्याची माहिती प्रभारी अधीक्षक व्ही.व्ही. वैद्य यांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. यानुसार, विभागीय उपआयुक्त वाय.एम. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी ग्रामीण व भरारी पथकाने धाड टाकली. या धाडीत मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या मद्याच्या बाटल्या, नंबर प्लेट नसलेली स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ६ लाख ८२ हजार ९७६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी ७च्या सुमारास करण्यात आली.
या प्रकरणी नितेश दिनेश आरेकर (३२, रा.नरवण ता.गुहागर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितेश आरेकर याने गोवा बनावट मद्याचे काही बॉक्स घराच्या बाजूस गोठ्यात तर गावठी दारू व काही बॉक्स स्विफ्ट डिझायर कारमध्ये ठेवले होते. यानंतर, बोऱ्या (ता.गुहागर) येथे कारवाई करून ६४ हजार ५८४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सुप्रिया संदेश ठाकूर (४२, रा.कोंड कारूळ बोऱ्या) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई निरीक्षक शरद जाधव, दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत, किरण पाटील, सहायक दुय्यम निरीक्षक विजय हातीसकर, जवान सागर पवार, दत्तप्रसाद कालेलकर, विशाल विचारे, महिला जवान अनिता नागरगोजे यांनी केली. पुढील तपास निरीक्षक शरद जाधव व दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत करीत आहेत.