रत्नागिरीतील मत्स्य विद्यालय स्थलांतरीत करण्याचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 20:16 IST2018-04-27T20:16:52+5:302018-04-27T20:16:52+5:30
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य विज्ञान महाविद्यालय, शिरगाव हे नागपूर येथे स्थलांतरीत करण्याचा घाट सरकारने घातल्याचे समजताच, हे मत्स्यविज्ञान महाविद्यालय नागपूर येथे स्थलांतरीत होऊ देणार नसल्याचे आमदार राजन साळवी यांनी सांगितले.

रत्नागिरीतील मत्स्य विद्यालय स्थलांतरीत करण्याचा घाट
रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य विज्ञान महाविद्यालय, शिरगाव हे नागपूर येथे स्थलांतरीत करण्याचा घाट सरकारने घातल्याचे समजताच, हे मत्स्यविज्ञान महाविद्यालय नागपूर येथे स्थलांतरीत होऊ देणार नसल्याचे आमदार राजन साळवी यांनी सांगितले.
साळवी यांनी यापूर्वीही हे महाविद्यालय अन्यत्र नेण्याचा विषय आला तेव्हा प्रखरपणे विरोध दर्शवला होता. तसेच सप्टेंबर २०१७च्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेमध्ये आमदार राजन साळवी, आमदार संजय कदम, आमदार संजय केळकर यांनी मत्स्यविज्ञान महाविद्यालय नागपूर येथे स्थलांतरीत न करण्याबाबत ठराव करुन घेतला आहे.
असे असतानाही पुन्हा एकदा सरकारने मत्स्यविद्यालय नागपूर येथे स्थलांतरीत करण्याचा घाट घातल्याचे समजताच साळवी यांनी कोकणात मत्स्यविज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याऐवजी सरकार कोकणातील मत्स्यविद्यालय नागपूर येथे स्थलांतरीत करण्याचा घाट घालत असल्याबाबत संताप व्यक्त केला.
ग्वाही दिली पण..
यापूर्वी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना एकत्र करुन मोठे आंदोलन उभे केले. अखेर शासनाने नमते घेत कोकणातील मत्स्य महाविद्यालय हे कोकणातच राहील, ते अन्यत्र कोठेही नेण्यात येणार नाही, अशी ग्वाही तत्कालिन मत्स्यमंत्री अनीस अहमद यांनी दिली होती.