रत्नागिरी किनारपट्टीच्या पोटात पुन्हा गोळा
By Admin | Updated: July 16, 2016 23:30 IST2016-07-16T22:47:30+5:302016-07-16T23:30:56+5:30
समुद्राला उधाण : पुढील तीन दिवसात मोठी भरती

रत्नागिरी किनारपट्टीच्या पोटात पुन्हा गोळा
रत्नागिरी : पौर्णिमेच्या ताणेला पावसाची व वादळी वाऱ्याची जोड उधाणलेल्या समुद्राला मिळाल्यास किनारपट्टीवासीयांसाठी ही भरती धोक्याची ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असून, पौर्णिमेची रात्र येथील नागरिकांसाठी वैऱ्यांची ठरू शकते. येथील नागरिकांवर जागता पहारा ठेवण्याची वेळ येणार आहे. मंगळवारपासूनचे पुढील तीनही दिवस हे धोक्याचे ठरण्याची शक्यता आहे.
गेले पंधरा दिवस किनारी भागात पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असतानाच समुद्राच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील धूपप्रतिबंधक बंधारे वाहून गेल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे किनारी भागात भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे. अमावस्येच्या उधाणावेळी किनारपट्टीवरील अनेक भागांमध्ये समुद्राचे पाणी शिरले होते. त्यावेळी मिऱ्या भागामध्ये सर्तकतेचा इशारासुध्दा देण्यात आला होता. परंतु, पौणिमेच्या ताणेची भीती या लोकांचा मनात घर करून बसली आहे. ही भरती रात्रीची असल्याने या लोकांना जागता पहारा देण्याची वेळ आली आहे.
अमावस्येचा भरतीवेळी मिऱ्या, काळबादेवी, मांडवी, पंधरामाड, राजीवडा, आदी भागांना उधाणाच्या भरतीचा चांगलाच तडाखा बसला होता. त्यावेळी १५ ते १६ फुटी लाटा किनाऱ्यावर धडकत होत्या. त्यामुळे पंधरामाड ते मिऱ्यापर्यंत असलेल्या बंधाऱ्याची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. तर काळबादेवी परिसरात स्मशानभूमीच उध्दवस्त होऊन वाळूमधून मानवी अवशेष बाहेर पडले होते. समुद्राचे पाणी गावात शिरण्यासही सुरुवात झाली होती. त्याचबरोबर पंधरामाड येथील २०० मीटरचा बंधारा समुद्राचा लाटांनी गिळंकृत केला होता. परंतु, आता येणाऱ्या भरतीमध्ये हा पूर्ण बंधारा नाहीसा होण्याचा मार्गावर आहे. त्यामुळे या परिसरात समुद्राचे पाणी घुसण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, प्रशासन अजूनही याबाबत उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी पंधरामाड परिसराची प्रशासनाने पाहणी करून समुद्राच्या उधाणाच्या भीतीखाली असलेल्या १४ कुंटुबांना स्थलांतराच्या नोटीस दिल्या होत्य परंतु, पर्यायी जागेअभावी स्थलांतर करणार नाही, असा पवित्रा येथील नागरिकांनी घेतला होता. परंतु, आता खऱ्या अर्थाने येथील नागरिकांसमोर पौर्णिमेच्या भरतीचे मोठे संकट उभे राहिले आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. त्यात मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्यांची संख्यासुध्दा अधिक आहे. त्यामुळे हे मच्छीमार समुद्रकिनारी आपले जीवन व्यतीत करतात. त्यामुळे समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांची संख्यासुध्दा जिल्ह्यात अधिक आहे. परंतु, आता या लोकांचा डोक्यावर पौर्णिमेच्या उधाणाचे सावट घोंघावत आहे. त्यात ही भरती पहाटेची असल्याने त्याला पावसाची व वादळी वाऱ्याची जोड मिळाली तर हे उधाण किनारपट्टीवासीयांसाठी धोक्याचे ठरण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
पौर्णिमेच्या भरतीचे सावट
मंगळवारी पौर्णिमेची भरती असून, भरतीचा धोका मिऱ्यावासीयांसोबत समुद्रकिनारी राहणाऱ्या इतर गावांही बसण्याची शक्यता आहे. या भरतीला पावसाची जोड मिळाली तर ती सर्वात धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. पुढचे दोन दिवस हे धोक्याचे असून, या दिवशी २.६० मीटर म्हणजेच १० ते १२ फुटाच्या लाटा किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.
एकामागोमाग संकटे; आता दर्श अमावस्या..
मंगळवारी पौर्णिमेच्या भरतीच्या सावटाखाली किनारपट्टीवासीयांना राहावे लागत असून, एकामागोमाग एक संकटे येथील नागरिकांसमोर येत आहेत. आता या भरतीनंरत भीती असणार ती दर्श अमावस्येच्या उधाणाची. परंतु, कितीही संकटे आली तरी कोणत्याही परिस्थितीत स्थलांतर न करण्याचा निर्णय या येथील नागरिकांनी घेतला आहे.
अजस्त्र लाटांचा होणार मारा.
किनारपट्टीवर उधाणाच्या भीतीचे सावट.
पंधरामाड येथील बंधारा पूर्ण नाहीसा होण्याचा मार्गावर.
द्यावा लागणार जागता पहारा.
किनारपट्टीवासीयांवरील उधाणाच्या संकटांचा धोका कायम.
पावसाची जोड मिळाल्यास उधाण धोक्याचे ठरण्याची शक्यता.