काेकण रेल्वे मार्गावरील गरीब रथ आता एलएचबी रेकमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 17:20 IST2024-06-25T17:19:51+5:302024-06-25T17:20:08+5:30
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या आणखी एका एक्स्प्रेस गाडीचे रुपडे पालटणार आहे. आतापर्यंत जुन्या रेकसह धावत असलेली गरीब ...

काेकण रेल्वे मार्गावरील गरीब रथ आता एलएचबी रेकमध्ये
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या आणखी एका एक्स्प्रेस गाडीचे रुपडे पालटणार आहे. आतापर्यंत जुन्या रेकसह धावत असलेली गरीब रथ एक्स्प्रेस ही गाडी अत्याधुनिक एलएचबी रेकसह धावू लागली आहे.
भारतीय रेल्वेच्या विविध मार्गांवर धावणाऱ्या गाड्यांचे जुने रेक बदलून त्याऐवजी नव्या श्रेणीतील एलएचबी रेकसह गाड्या चालवण्याचे धोरण रेल्वेने स्वीकारले आहे. त्यानुसार नवीन गाड्यांच्या उपलब्धतेनुसार एलएचबी गाड्या चालवण्यात येत आहेत. रेल्वेच्या या धोरणानुसार कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अनेक गाड्या जर्मन तंत्रज्ञानाने बनवलेल्या एलएचबी रेकसह चालवल्या जात आहेत.
आता केरळमधील कोचुवेली ते मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान धावणाऱ्या गरीब रथ एक्स्प्रेसला (१२२०२/१२२०१) कोचुवेली येथून सुटणाऱ्या फेरीसाठी साेमवारपासून एलएचबी रेक उपलब्ध केला आहे. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली मार्गावर धावताना मंगळवारच्या फेरीपासून एलएचबी रेक उपलब्ध केला जाणार आहे.
पंधरा डब्यांची ‘गरीब रथ’ २२ डब्यांची
नव्या कोच रचनेनुसार कोकण रेल्वे मार्गे धावणारी गरीब रथ एक्स्प्रेस पूर्वीच्या पंधरा डब्यांच्या ऐवजी आता एलएचबी स्वरूपात धावू लागली आहे. त्यामुळे ही गाडी आता पंधरा डब्यांऐवजी २२ डब्यांची होणार आहे.
‘या’ स्थानकांवर थांबते रेल्वे
कोकण रेल्वे मार्गावर आल्यानंतर ही गाडी उडपी, मुकाम्बिका रोड, अंकोला, कारवार, मडगाव, रत्नागिरी हे थांबे घेत पुढे पनवेल, ठाणे या स्थानकांवर थांबते. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसला या गाडीचा प्रवास संपतो.