Ratnagiri News: दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी जगबुडी नदी पात्रात उतरलेले तीन जण वाहून गेल्याची घटना घडली. गुरूवारी (२९ ऑगस्ट) सायंकाळी ही घटना घडली. तिघांपैकी दोघांना वाचवण्यात नागरिकांना यश आले, तर एक जणांचा शोध सुरूच आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात ही घटना घडली. दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी काही लोक नदीत पात्रात उतरले होते. पण, पाण्याचा वेग वाढला आणि त्यातच खोलीचा अंदाज न आल्याने तीन जण वाहून गेले.
यातील दोघे कसेतरी वाचले आणि नदीच्या काठावर आले. त्यांना लोकांनी तातडीने बाजूला नेले. दरम्यान, ४० वर्षाचे मंगेश पाटील यांना पाण्याचा प्रवाह खूप असल्याने काठावर येता आले नाही आणि ते वाहून गेले.
याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी संबंधित यंत्रणांना याची माहिती दिली आणि तातडीने एनडीआरएफच्या पथकाला बोलवण्यात आले.
गुरूवारी सांयकाळपासून मंगेश पाटील यांचा जगबुडी नदीत शोध सुरू असून, अद्याप त्यांच्याबद्दल काही कळू शकलेले नाही.