चिपळूण (जि. रत्नागिरी) : शेअर मार्केटच्या नावाने गुंतवणुकीचे जाळे उभारून परताव्याचे आमिष दाखवून टीडब्लूजे असाेसिएट कंपनीने चिपळुणातील दाेघांची तब्बल २८ लाख ५० हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या फसवणूकप्रकरणी कंपनीचा संचालक समीर नार्वेकर याच्यासह चौघांवर चिपळूण पोलिस स्थानकात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कामथे येथील ठेकेदार प्रतीक दिलीप माटे (२९) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार समीर सुभाष नार्वेकर (रा. गुहागर) त्याची पत्नी नेहा नार्वेकर (रा. गुहागर), सहकारी संकेश रामकृष्ण घाग (रा. चिपळूण) व सिद्धेश शिवाजी कदम (रा. कामथे, चिपळूण) या संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.
कंपनीकडून सुमारे सात टक्क्यांपर्यंत व्याजाचे आमिष दाखवून लोकांकडून फंड गोळा करण्यात आला. सुरुवातीला गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करून त्यांची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक वाढवण्यात आली. गेली काही वर्ष गुंतवणूकदारांना ३ ते ७ टक्क्यांपर्यंतचा परतावा कंपनीकडून दिला जात होता.सन २०१८ पासून चिपळूण, गुहागर, दापोली या ठिकाणी शाखा कार्यालय असलेल्या या कंपनीने तब्बल १२०० कोटींच्या ठेवी गोळा केल्या आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ठेवीदारांना त्यांचा परतावा वेळेवर दिला गेला नाही. मात्र, याबाबत काेणत्याच तक्रारी दाखल झालेल्या नव्हत्या. आता कामथे येथील प्रतीक माटे यांनी तक्रार देताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक माटे यांनी साडेतीन लाख, तर त्यांची बहीण तृप्ती माटे यांनी २५ लाखांची गुंतवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.दुसरा गुन्हा दाखलयापूर्वी यवतमाळ येथे ३९ लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. अवधूतवाडी पाेलिस स्थानकात संचालकासह पाच जणांविराेधात हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर चिपळुणात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुंतवणूकदार स्थानिक पोलिस स्थानकात चौकशी करू लागले आहेत. संबंधित कंपनीबाबत गुंतवणूकदारांची तक्रार असेल तर त्यांनी रत्नागिरी येथील आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे द्याव्यात. - फुलचंद मेंगडे, पाेलिस निरीक्षक, चिपळूण