गुहागर : शैक्षणिक काम आणि परीक्षेबाबत होत असलेल्या अवैध गोष्टींना विरोध केल्यामुळे येथील खरे ढेरे महाविद्यालयातील चार प्राध्यापकांना काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण झाल्याची घटना बुधवारी सकाळी ८:३० वाजता घडली. याविरोधात प्राध्यापक गोविंद भास्करराव सानप यांनी गुहागर पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.महेश जनार्दन भोसले, संदीप भोसले, रोहन भोसले (सर्व रा. गुहागर) अशी या संशयितांची नावे आहेत. गोविंद सानप यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ते त्यांचे सहकारी प्राध्यापक अनिल शशिकांत हिरगोड, संतोष विठ्ठलराव जाधव व नीळकंठ सखाराम भालेराव हे महाविद्यालयात जात असताना महाविद्यालयाबाहेर रस्त्यावर महेश भोसले, संदीप भोसले, रोहन भोसले व त्यांच्यासोबत असणाऱ्या चार ते पाच अनोळखी व्यक्तींनी लाथाबुक्क्यांनी, काठीने बेदम मारहाण केली.गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक कामात व परीक्षांमध्ये होणाऱ्या अवैध कामांना विरोध दर्शवल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आली असल्याचे सानप यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी महेश भोसले, संदीप भोसले, रोहन भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास गुहागर पोलिस करत आहेत.
Ratnagiri: अवैध गोष्टींना विरोध केल्यामुळे गुहागरमध्ये चार प्राध्यापकांना मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 12:15 IST