रत्नागिरी-नागपूर महामार्ग चौपदरीकरणाचा तिढा अद्याप कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 16:52 IST2018-03-02T16:52:51+5:302018-03-02T16:52:51+5:30

रत्नागिरी-नागपूर महामार्ग चौपदरीकरणात रत्नागिरीतील साळवी स्टॉप ते हातखंबा तिठ्यापर्यंत रस्ता रुंदीकरणासाठी ३० मीटर की ४५ मीटर जागा घेतली जाणार याबाबतचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

The four-lane of Ratnagiri-Nagpur highway is still in progress | रत्नागिरी-नागपूर महामार्ग चौपदरीकरणाचा तिढा अद्याप कायम

रत्नागिरी-नागपूर महामार्ग चौपदरीकरणाचा तिढा अद्याप कायम

ठळक मुद्देकुवारबावमध्ये पोलीस बंदोबस्तात जमीन मोजणी- व्यापारी संघ प्रतिनिधींनी घेतली गडकरींची भेट- ३० मीटर रस्ता रुंदीकरणाबाबत आग्रह कायम

रत्नागिरी : रत्नागिरी-नागपूर महामार्ग चौपदरीकरणात रत्नागिरीतील साळवी स्टॉप ते हातखंबा तिठ्यापर्यंत रस्ता रुंदीकरणासाठी ३० मीटर की ४५ मीटर जागा घेतली जाणार याबाबतचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

व्यापारी संघ प्रतिनिधींनी नवी दिल्ली येथे गडकरी यांची भेट घेतल्यानंतरही आश्वासनाखेरीज काहीच मिळाले नाही. सायंकाळपर्यंत कोणताही आदेश न आल्याने महामार्ग विभागाने प्रशासनाच्या मदतीने ७०० मीटर लांबीच्या कुवारबाव येथील रस्त्याची मोजणी केली. उद्रेक होण्याची शक्यता लक्षात घेऊन कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

साळवी स्टॉप ते हातखंबा या मार्गालगत अनेक बाजारपेठा आहेत. चौपदरीकरणासाठी ४५ मीटर जागा घेतल्यास या बाजारपेठा, घरे यांचे स्थलांतर करावे लागणार आहे. त्यामुळे ४५ ऐवजी ३० मीटर रुंदीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली होती.

या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी कुवारबाव व्यापारी संघाचे अध्यक्ष सुनील साळवी, कार्याध्यक्ष नीलेश लाड व सचिव प्रभाकर खानविलकर यांनी केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची गुरुवारी दुपारी १.३० वाजता नवी दिल्ली येथे मंत्रालयातील श्रमशक्ती दालनात भेट घेतली.

३० मीटर रस्ता रुंदीकरण करावे या मागणीचे निवेदन मंत्री गडकरी यांना यावेळी देण्यात आले. त्यांच्याशी या शिष्टमंडळाने चर्चा केली. मंत्री गडकरी यांनी याप्रकरणी अधिकाऱ्यांना तत्काळ पडताळणीचे आदेश दिल्याची माहिती व्यापारी संघाचे अध्यक्ष सुनील साळवी यांनी प्रसारमाध्यमांना दूरध्वनीवरून दिली. मात्र कोणताही आदेश न आल्याने महामार्ग विभाग व प्रशासनाकडून कुवारबाव येथील ७०० मीटर लांबीच्या रस्त्याची ४५ मीटर रुंदीकरणासाठी मोजणी पूर्ण करण्यात आली.

मिऱ्या-रत्नागिरी ते हातखंबापर्यंतचा मार्ग हा मुंबई गोवा महामार्गाचा उपमार्ग असून येथे महामार्ग कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ४५ मीटर रुंदीकरणासाठी जागा घेतली गेल्यास कुवारबावसह मार्गालगतच्या सर्वच बाजारपेठा बाधित होणार आहेत. त्यामुळे ४५ ऐवजी ३० मिटर जागा घेण्यात यावी, यासाठी कुवारबाव दशक्रोशीतील जनता आग्रही आहे.

कुवारबाव व्यापारीस संघाने त्यामध्ये पुढाकार घेतला आहे. २२ फेब्रुवारीला होणारी मोजणी रोखण्यासाठी व तीव्र विरोध दर्शविण्यासाठी जेलभरोचा इशाराही देण्यात आला होता. मात्र मोजणीत कोणत्याही प्रकारे अडथळा आणला गेल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करावे लागतील, असे उपविभागीय अधिकारी अमित शेडगे यांनी कुवारबाव येथे स्पष्ट केले. त्यानंतर दिवसभरात कडक पोलीस बंदोबस्तामध्ये मोजणी पूर्ण करण्यात आली.

कुवारबाव व्यापारी संघाला आशा

कुवारबावमध्ये उड्डाणपूल उभारू नये. सध्याच्या रस्त्याचे चौपदरीकरणासाठी ३० मीटर रुंदीकरण करावे व बाजारपेठ व घरे वाचवावीत अशी कुवारबाववासियांची मागणी होती. त्यासाठीच व्यापारी संघाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली. या भेटीत मंत्र्यांनी अनुकुलता दाखविली असून ते कुवारबाववासियांची भावना लक्षात घेऊन योग्य न्याय देतील, अशी आशा व्यापारी संघाच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.

Web Title: The four-lane of Ratnagiri-Nagpur highway is still in progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.