दुर्दैवी! खूप वेळ ढाेल वाजविला, विश्रांतीसाठी बसले अन् माजी सैनिकाचा झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 18:03 IST2022-03-21T17:57:55+5:302022-03-21T18:03:37+5:30
शिमगाेत्सवाचा सण साजरा करत असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दुर्दैवी! खूप वेळ ढाेल वाजविला, विश्रांतीसाठी बसले अन् माजी सैनिकाचा झाला मृत्यू
देवरूख : खूप वेळ ढाेल वाजविल्यानंतर विश्रांतीसाठी बसलेले माजी सैनिक सहदेव रामचंद्र लाड (६८) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ही घटना संगमेश्वर तालुक्यातील असुर्डे येथे १९ मार्च राेजी घडली. शिमगाेत्सवाचा सण साजरा करत असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सहदेव लाड हे सैन्य दलात दाखल झाल्यानंतर त्यांनी आपल्या अंगी असलेल्या अन्य कलाकौशल्यांच्या साहाय्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. सैन्यात सेवा करत असताना लाड यांना विविध शौर्यपदकेही प्राप्त झाली होती. सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर सहदेव लाड हे एन्रॉन येथे आणि त्यानंतर भारत संचार निगम, संगमेश्वर कार्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून सेवेत होते.
असुर्डे गावच्या शिमगोत्सवामध्ये त्यांनी गावकऱ्यांसोबत माड आणला, खूप वेळ ढोल वाजवला. भक्तगण पालखी नाचवत असताना लाड सहकाऱ्यांसोबत तालात खूप वेळ ढोल वाजवत होते. पालखी सहाणेवर बसल्यानंतर ढोल वाजवणे बंद झाले आणि सहदेव लाड हे विश्रांतीसाठी बसले. शेजारी बसलेल्या माणसासोबत बोलत असतानाच ते हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
उपचारांसाठी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शिमगोत्सवात अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे मौजे असुर्डे गावावर दु:खाची छाया पसरली आहे. सहदेव लाड यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, सुना व नातवंडे, असा परिवार आहे.