Ratnagiri: खैर तस्करी करणारी दापोलीतील टोळी गजाआड, खालापूर येथील वन विभागाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 15:24 IST2025-09-22T15:23:50+5:302025-09-22T15:24:20+5:30
मंडणगड परिसरातून १४ घनमीटर खैर जप्त

Ratnagiri: खैर तस्करी करणारी दापोलीतील टोळी गजाआड, खालापूर येथील वन विभागाची कारवाई
दापोली (जि. रत्नागिरी) : खालापूर तालुक्यातील चावणी परिसरात राखीव वनक्षेत्रातील खैर वृक्षांची तोड करून तस्करी करणाऱ्या दापाेलीतील पाचजणांना अटक करण्यात आली आहे. तसेच एका चारचाकी वाहनासह दुचाकी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (१५ सप्टेंबर) मध्यरात्री करण्यात आली. याप्रकरणी न्यायालयाने या पाचजणांना पाच दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.
खालापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांना चावणी परिसरात बेकायदेशीर खैर वृक्षतोड सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागच्या पथकाने एका पिकअप वाहनावर खैर लाकडे भरत असताना कारवाई केली. अंधाराचा फायदा घेत काही आरोपी पळून गेले. मात्र, चालक रूपेश विनायक पवार (वय ३४, रा. कुडावळे, ता. दापोली) याला ताब्यात घेऊन वाहनाची तपासणी केली असता त्यात खैर लाकडे आढळली.
रूपेशच्या चौकशीतून या तस्करीत आणखी चारजणांचा सहभाग असल्याचे उघडकीला आले. त्यानंतर पोलिसांनी राम शिवाजी पवार याला शेमडी चावणी रस्त्यावरून दुचाकीसह ताब्यात घेतले, तर पाली वाकण येथून किरण हरिश्चंद्र पवार, रोहित दीपक जाधव व ऋतिक शशिकांत पवार (सर्व रा. कुडावळे, ता. दापोली) यांना अटक करण्यात आली.
मंडणगड परिसरातून १४ घनमीटर खैर जप्त
अधिक चौकशी केली असता या टोळीने यापूर्वीही विविध राखीव वनक्षेत्रांत खैर वृक्षतोड करून तस्करी केल्याचे उघड झाले आहे. त्यांच्या जबाबानुसार मंडणगड परिसरातही धाड टाकून १४ घनमीटर खैर लाकडे जप्त करून दापोली वनपरिक्षेत्राच्या ताब्यात देण्यात आली आहेत.