तिवरे धरण दुर्घटनेतील ५ जण अजून बेपत्ताच; १८ मृतदेह हाती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 03:50 AM2019-07-05T03:50:04+5:302019-07-05T03:50:14+5:30

आतापर्यंत एकुण १८ मृतदेह हाती लागले असून अजून पाचजण बेपत्ता असून त्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.

 Five people still missing in the dam earthquake; 18 dead bodies | तिवरे धरण दुर्घटनेतील ५ जण अजून बेपत्ताच; १८ मृतदेह हाती

तिवरे धरण दुर्घटनेतील ५ जण अजून बेपत्ताच; १८ मृतदेह हाती

Next

चिपळूण (रत्नागिरी) : तिवरे धरण दुर्घटनेतील आणखी पाच बेपत्ता ग्रामस्थांचे मृतदेह गुरूवारी सापडले आहेत. आतापर्यंत एकुण १८ मृतदेह हाती लागले असून अजून पाचजण बेपत्ता असून त्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.
मंगळवारी रात्री तिवरे धरण फुटल्याने गावातील भेंदवाडीमध्ये कहर झाला. काहीजण जेवायला बसले होते, काहीजण झोपले होते. अचानक पाण्याचा लोंढा आला आणि काही तासातच अख्खी भेंदवाडी धरणाच्या पाण्याने गिळली. या वाडीतील १३ घरे, गोठे पाण्यात वाहून गेले. या दुर्घटनेत काहींनी आपला जीव वाचवला. मात्र २४ लोक यात बेपत्ता झाले. त्यातील बळीराम कृष्णा चव्हाण हे एकमेव आतापर्यंत जिवंत सापडले आहेत. बुधवारी रात्रीपर्यंत १३ जणांचे मृतदेह हाती आले होते. खा. विनायक राऊत, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापन निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाखांचा धनादेश देण्यात आला.

काळ आला होता पण...
काळ आला होता पण वेळ आली नव्हती, देवाचा धावा केल्यानेच वाचलो, अशी प्रतिक्रिया या संकटातून बचावलेल्या अरूण पुजारी यांनी बोलून दाखविली. पुजारी हे मूळचे मालवण तोंडवली येथील असून त्यांनी तिवरे गावामध्ये भेंदवाडी येथे मजबूत दोन मजली घर बांधले आहे. स्लॅबच्या असलेल्या या घराच्या मध्यभागी या पाण्याचा मारा होत होता. मात्र आपण वरच्या मजल्यावर असल्याने सुखरुप राहिलो. नजरेसमोरुन पाण्याचा मोठा प्रवाह तासभर वाहत होता. हे भीतीदायक चित्र पाहताना आपणदेखील मनाची तयारी केली होती. मात्र सुदैवाने घराचा मागील कोपरा पाण्याच्या माऱ्यामुळे तुटून गेला. स्लॅबच्या घरामुळे आपण वाचल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title:  Five people still missing in the dam earthquake; 18 dead bodies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.