गणपतीपुळे समुद्रात पाच जण बुडाले, एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 19:42 IST2021-12-19T19:41:35+5:302021-12-19T19:42:17+5:30
Ganpatipule : गणपतीपुळे येथील जीवरक्षकांनी चौघांना बुडवताना वाचवले असून, त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गणपतीपुळे समुद्रात पाच जण बुडाले, एकाचा मृत्यू
रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे येथे फिरायला आलेल्या ५ पर्यटकांपैकी एकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवार, १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. गणपतीपुळे येथील जीवरक्षकांनी चौघांना बुडवताना वाचवले असून, त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रत्नाकर कल्पनाथ सरोज (वय २४) असे बुडून मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. गोलू समरजित सरोज (वय २६), रोहित संजीवन वर्मा (वय २३), कपील रामशंकर वर्मा (वय २८), मयूर सुधीर मिश्रा (वय २८, सर्व मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. लोटे, खेड ) यांना बुडताना वाचवण्यात यश आले आहे.
रविवारी सायंकाळी हे सर्वजण समुद्रात पोहण्यासाठी गेले होते. त्याचवेळी रत्नाकर सरोज यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते गटांगळ्या खाऊ लागले. ही बाब त्यांच्या साथिदारांच्या लक्षात येताच त्यांनी आरडा-ओरडा करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून जीवरक्षक अक्षय माने, ओंकार गवाणकर, आशिष माने, अनिकेत राजवाडकर, मयुरेश देवरुखकर यांनी समुद्रात उड्या घेऊन पाचही जणांना पाण्याबाहेर काढले. परंतु, रत्नाकर सरोज यांच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर गणपतीपुळे पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर रत्नाकर सरोज यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.