शिवाजी गोरेदापोली: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायतीचे पाच नगरसेवक शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार असल्याने ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून उद्धव ठाकरे गटात सहभागी झालेल्या सात पैकी पाच नगरसेवक शिंदे गटात जाण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे गटातून शिंदे गटात काल, पक्षप्रवेश केल्याने जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. दरम्यानच, दापोली नगरपंचायतीतील पाच नगरसेवकांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने नगरपंचायतीच्या राजकारणात मोठी उलथापालत होणार आहे. राज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत ते पक्षप्रवेश करणार आहेत. त्यामुळे माजी आमदार संजय कदम यांना हा मोठा धक्का आहे.दोन वर्षांपूर्वी दापोली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत तत्कालीन आमदार योगेशदादा कदम यांना बाजूला ठेवून शिवसेना व राष्ट्रवादी यांनी एकत्र येत १४ नगरसेवक निवडून आणले होते. यामध्ये राष्ट्रवादीचे ८ तर शिवसेनेच्या ६ नगरसेवकांचा समावेश होता. शिवसेनेच्या ममता मोरे या नगराध्यक्ष झाल्या होत्या. त्यानंतर राज्यातील घडामोडी घडल्यावर शिवसेनेचे नगरसेवक हे उद्धव ठाकरे गटाशी ठाम राहिले. तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीच्या ७ नगरसेवकांनी उप नगराध्यक्ष रखांगे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र गट स्थापन केला व आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत आमदार योगेश कदम विजयी झाले. यानंतर त्याची राज्यमंत्रीपदी वर्णी देखील लागली. यादरम्यान विद्यमान सत्ताधारी पक्षातील ५ नगरसेवकांनी स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला. नगरपंचायतीत आमदार कदम समर्थक नगरसेवकांची संख्या दोन आहे. पाच नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर आमदार योगेश कदम समर्थकांच्या नगरसेवकांची संख्या सात होणार आहे. त्यामुळे दापोली नगरपंचायतीच्या सत्तेत मोठे फेरबदलाचे संकेत आहेत. भविष्यात दापोली नगरपंचायतीत आमदार योगेश कदम यांच्या नगरसेवकांच वर्चस्व वाढणार आहे
शिंदेसेनेचे दापोली नगरपंचायतीत ऑपरेशन टायगर, पाच नगरसेवक ठाकरे गटाची साथ सोडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 13:14 IST