लाेकमत न्यूज नेटवर्क
असगोली : वरचापाटमधील काही घरांमधून वापरात नसलेली जळावू लाकडे संकलित करुन ती स्मशानभूमीत ठेवण्याचे काम १२ तरुणांनी केले. त्यामुळे कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी गुहागर नगर पंचायतीला लाकडे उपलब्ध झाली आहेत. गुहागरवासीयांनी या उपक्रमाबद्दल युवकांचे कौतुक केले आहे.
गुहागर वरचापाट ब्राह्मणवाडीमधील १० -१२ युवकांच्या मनामध्ये कोरोनाच्या काळात काहीतरी काम करावे, असे होते. गुहागर नगर पंचायतीला सध्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहे. याकामी मदत करण्याची तयारीही या युवकांनी दाखवली होती. मात्र, तशी संधी त्यांना मिळाली नाही. त्याचवेळी चर्चेमध्ये ब्राह्मणवाडीमधील लाकडांचे संकलन करुन ती स्मशानभूमीत देण्याचा विचार या युवकांनी ठरवला. त्याप्रमाणे वाडीतील घरांमध्ये निरोप दिले. अरुणा दामले, अनुराधा दामले, अनिल वैद्य या ग्रामस्थांनी त्यांच्याकडील लाकडे देण्याची तयारी दाखवली. शनिवारी सकाळी एक टेम्पो बोलावून या तीन घरांच्या खोपडीमधील लाकडे भरण्यात आली. नगरसेवक समीर घाणेकर यांच्यामार्फत नगर पंचायतीला लाकडे ताब्यात घेण्यासाठी बोलावले. नगर पंचायतीचे कर्मचारी सुनील नवजेकर आणि ओंकार लोखंडे यांनी स्मशानातील जागा दाखवली. त्याठिकाणी टेम्पोमधील लाकडे उतरविण्यात आली.
या उपक्रमामध्ये रोहित मावळंकर, प्रथमेश परांजपे, मंदार वैद्य, सुशांत दीक्षित, अथर्व घाणेकर, अमोघ खरे, चैतन्य ओक, सोहम वैद्य, सुमित आठवले, अखिलेश खरे, यश फडके व रोहन फडके हे युवक सहभागी झाले होते.
--------------------------
ब्राह्मणवाडीतील आणखी काही ग्रामस्थांनी लाकडे देण्याचे कबूल केले आहे. गुहागर नगर पंचायतीला आवश्यकता भासेल त्यावेळी ही लाकडे आम्ही नेऊन देणार आहोत.
- चैतन्य ओक, गुहागर वरचापाट