दापोलीच्या रणांगणात अनिल परब-रामदास कदम यांचे शीतयुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 12:15 PM2021-12-10T12:15:48+5:302021-12-10T12:17:50+5:30

निवडणुकीची सूत्रे आमदार योगेश कदम यांच्याकडून काढून माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे देण्याची अनिल परब यांची पहिली चाल यशस्वी झाली आहे. मात्र, त्यात नाराज झालेल्या शिवसैनिकांना सोबत घेत आमदार योगेश कदम आपली चाल खेळणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Fight between Guardian Minister Anil Parab and Shiv Sena leader Ramdas Kadam on the occasion of Nagar Panchayat elections in Dapoli and Mandangad | दापोलीच्या रणांगणात अनिल परब-रामदास कदम यांचे शीतयुद्ध

दापोलीच्या रणांगणात अनिल परब-रामदास कदम यांचे शीतयुद्ध

Next

मनोज मुळ्ये

रत्नागिरी : दापोली आणि मंडणगडमधील नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री अनिल परब आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्यातील शीतयुद्ध रंगू लागले आहे. निवडणुकीची सूत्रे आमदार योगेश कदम यांच्याकडून काढून माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे देण्याची अनिल परब यांची पहिली चाल यशस्वी झाली आहे. मात्र, त्यात नाराज झालेल्या शिवसैनिकांना सोबत घेत आमदार योगेश कदम आपली चाल खेळणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दापोलीतील रिसॉर्टप्रकरणी केलेल्या पाठपुराव्याचा मोठा फटका पालकमंत्री अनिल परब यांना सहन करावा लागला. या साऱ्या प्रकरणात परब यांच्यावर शिंतोडे उडाले आहेत. सोमय्या यांना या रिसॉर्टबाबत माहिती पुरवण्यात शिवसेना नेते रामदास कदम यांचाच मोठा हात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी केला आणि त्यासाठी काही ऑडिओ क्लिपही सादर केल्या. त्यामुळे साहजिकच अनिल परब आणि रामदास कदम यांच्यामध्ये वितुष्ट आले आहे.

या प्रकरणात अनिल परब किंवा शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी कोणतीही बाजू मांडली नसली तरी या साऱ्यामध्ये शिवसेनेकडून रामदास कदम यांना दोषी मानण्यात येत असल्याचे दिसत नाही. त्यामुळेच विधान परिषदेच्या निवडणुकांमधून रामदास कदम यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. केवळ त्यांच्या आमदारकीला ब्रेक लावून न थांबता अनिल परब यांनी आता दापोली, मंडणगड नगरपंचायतीची मुख्य सूत्रे सूर्यकांत दळवी यांच्याकडे सोपवून पुढील चाल खेळली आहे.

२०१४ विधानसभेत पराभूत झाल्यानंतर दळवी यांनी आपल्या पराभवाला रामदास कदम यांनाच जबाबदार धरले होते. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकांमध्ये या जागी योगेश कदम यांची वर्णी लागली. त्यामुळे दळवी आणि रामदास कदम, तसेच दळवी आणि योगेश कदम यांच्यामध्ये सख्य नाही. शत्रूच्या शत्रूला मित्र मानण्याचा सिद्धांत येथे लागू झाला आहे. कदम यांच्यावर मात करण्यासाठी परब यांनी सूर्यकांत दळवी यांना जवळ केले आहे.

परब यांची ही चाल यशस्वी झाली असली तरी त्याने शिवसेनेचेच अनेक जण नाराजही झाले आहेत. अशा नाराजांची मोट बांधून योगेश कदम या निवडणुकीत आपले वजन दाखवणार का, असा प्रश्न आता पुढे आला आहे. आता ही लढाई दळवी विरुद्ध कदम, अशी प्रतिष्ठेची होणार असली तरी मुळात ही लढाई परब विरुद्ध कदम, अशीच आहे.

दळवी यांचे पुनरागमन

दापोलीत शिवसेना वाढवण्यात सर्वांत मोठा वाटा सूर्यकांत दळवी यांचा आहे. १९९० पासून सलग पाच निवडणुका जिंकण्याची मोठी कामगिरी दळवी यांनी केली आहे. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सूर्यकांत दळवी यांनी रामदास कदम यांच्यावर आरोप केले. त्यानंतर ते शिवसेनेत फारसे सक्रिय नव्हते. ते भाजपमध्ये जाणार, ते राष्ट्रवादीत जाणार, अशा अनेक चर्चा झाल्या. प्रत्यक्षात ते कोणत्याही पक्षात गेले नसले तरी शिवसेनेत मात्र सक्रिय नव्हते.

दोघांच्या भांडणार लाभ तिसऱ्याचा

परब आणि कदम यांच्यातील वादाचा लाभ सूर्यकांत दळवी यांना झाला आहे. दळवी आणि अनिल परब यांच्यात खूप चांगली मैत्री असल्याचे आजपर्यंत कधीही समोर आलेले नाही. पालकमंत्री झाल्यानंतर अनिल परब यांनी जुने शिवसैनिक म्हणून दळवी यांना पक्षात परत सक्रिय करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. मात्र, आता कदम यांना शह देण्यासाठी त्यांनी दळवी यांना पुढे आणले आहे.

Web Title: Fight between Guardian Minister Anil Parab and Shiv Sena leader Ramdas Kadam on the occasion of Nagar Panchayat elections in Dapoli and Mandangad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.