संदीप बांद्रे
चिपळूण : पिंपळी येथील काळकाई मंदिर येथे सोमवारी रात्री १०.३० वाजता थार, रिक्षा आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. यामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये थार चालक, रिक्षा चालक, तसेच रिक्षातील प्रवासी पती, पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलग्याचा समावेश आहे. पिंपळी येथील मदरश्यात एका लहान मुलाला सोडण्यासाठी एक कुटुंब रिक्षाने येत होते. काळकाई मंदिर येथे ही रिक्षा आली. त्याच मागावून एक अती वेगाने थार गाडी येत होती. थार वरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने रिक्षाला उडवले. रिक्षा समोरून येणाऱ्या आयशर ट्रकवर आदळली. रिक्षात असलेले चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर थार चालकही या अपघातात मृत झाला, असल्याची माहिती मिळत आहे. रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद पोलिसात झाली नव्हती. या अपघातातील रिक्षाचालक इब्राहिम लोणे हे स्थानिक पिंपळी येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. तर थार गाडी हरियाणा पासिंग असून या अपघातातील मृतांना कामथे रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान पिंपळी येथील मार्गावर वाहतूक रखडली होती. या अपघातापूर्वी काहीसा नाट्यमय प्रकार घडला. अपघातग्रस्त थार गाडीतील ३५ वर्षीय तरुण बहादूरशेखनाका येथे अभिरुची हॉटेल जवळ आला आणि तेथुन पुन्हा गाडी बहादूरशेख नाकाकडे जाण्यासाठी हॉटेल अभिरुची येथून वळली. त्याचवेळी एका तरुणीने वाचवा वाचवा अशी ओरडत थार गाडीतून रस्त्यावर उडी मारली. या तरुणीने एका थांबवून त्या थार गाडीचा पाठलाग करा, माझी गाडी चोरत आहे, असे सांगताच त्या कार चालकाने तरुणीला गाडीत बसवून पाठलाग केला परंतु तो तरुण पिंपळीच्यादिशेने वेगाने निघून गेला. त्यानंतर त्या कार चालकाने तरुणीला घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन जात होता. मात्र ती तरुणी पोलिसांचा नाव घेताच घाबरल्याने त्या गाडीतुनही उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार चालकाने गाडी थांबवून बहादूरशेख नाका येथे उतरली. त्यानंतर काही वेळातच पिंपळी येथे अपघात घडला.